Home राजकीय भाजपचा निसटता विजय, महायुतीचे सत्तागणित तापले..स्वीकृत सदस्य करीता चार दावेदार उभे….

भाजपचा निसटता विजय, महायुतीचे सत्तागणित तापले..स्वीकृत सदस्य करीता चार दावेदार उभे….

0
1120

 

गडचिरोली :

गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा गाठला असला, तरी हा विजय अत्यंत निसटता ठरला आहे. निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली असून, सत्तास्थापनेसाठी भाजपसमोर अनेक राजकीय आणि प्रतिमेची आव्हाने उभी राहिली आहेत.

बहुमत मिळाल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांची नेमणूक तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले बांधकाम सभापतीपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पदाशी मोठ्या निधीचा ताबा संबंधित असल्याने इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

दरम्यान, भाजपच्या एका उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाल्याने, त्या उमेदवाराची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपमधील एक प्रभावी नेते स्वीकृत सदस्यपद पुन्हा मिळावे यासाठी मुंबईत ठाण मांडून बसल्याची चर्चा असून, त्यांच्या नियुक्तीसाठी संबंधित आमदारही प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ने ही या निवडणुकीत ५ नगरसेवक निवडून आणत निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त सत्ता स्थापन करण्याचे गणित सध्या जोरात चर्चेत आहे. याच अनुषंगाने नूतन नगराध्यक्ष आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुती धर्म पाळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाल्यास, माजी नगराध्यक्षांना उपनगराध्यक्षपद, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला बांधकाम सभापतीपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीतील मोठ्या मित्र पक्षाला विरोधी बाकावर बसवणे भाजपला परवडणारे नसल्याने, भाजपकडून याबाबत सावध आणि तडजोडीची भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

या निवडणुकीत चुकीच्या उमेदवार निवडीमुळे भाजपचे अनेक उमेदवार अल्प फरकाने पराभूत झाल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत नियोजन आणि रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात गडचिरोली नगरपालिकेसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असतानाही अपेक्षित आणि दर्जेदार विकासकामे न झाल्याचा ठपका भाजपवर ठेवला जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. या अपुऱ्या विकासकामांचा थेट परिणाम भाजपच्या प्रतिमेवर झाला असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

यासोबतच, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व ठरलेली घटना म्हणजे एकाच नगराध्यक्षाला एका कार्यकाळात सलग तीन वेळा अपात्र ठरवण्यात येणे. या प्रकरणामुळे भाजपची प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि नेतृत्वक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. नगरपालिकेतील हा वादग्रस्त कारभार आणि वारंवार झालेली अपात्रता भाजपसाठी मोठा राजकीय फटका ठरल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

याच पार्श्वभूमीवर, मागील निवडणुकीत केवळ एक नगरसेवक असलेल्या विरोधी पक्षाकडून यावेळी तब्बल १२ नगरसेवक निवडून येणे ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरली आहे. मजबूत विरोधी पक्ष उभा राहिल्याने आगामी काळात नगरपालिकेतील निर्णयप्रक्रिया आणि कारभार अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.

आता भाजप स्वतःच्या १५ नगरसेवकांच्या बळावर एकहाती सत्ता स्थापन करणार, की प्रतिमा सावरण्यासाठी आणि स्थैर्यासाठी महायुतीतील मित्र पक्षांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला गती देणार का—याकडे गडचिरोलीकरांचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here