गडचिरोली | प्रतिनिधी :
अत्यंत दुर्गम, आदिवासी व संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेची भीषण वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून नवजात बालकांसाठी अत्यावश्यक असलेली ‘रोटा’ लस पूर्णतः अनुपलब्ध असल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे नवजात बालकांचे पालक प्रचंड चिंतेत असून बालकांच्या आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अशी दयनीय अवस्था असणे अत्यंत लज्जास्पद आहे. मुख्यमंत्र्यांना निवडणूक प्रचार, राजकीय सभा व भाषणांसाठी वेळ आहे; मात्र आदिवासी, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, हे दुर्दैवी आहे.
जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून वैद्यकीय साधनसामग्री अपुरी आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत असून त्या वापरण्यायोग्य नाहीत. जिल्हा रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय सुविधा असल्याचे केवळ कागदावरच दिसून येत असून प्रत्यक्षात रुग्णांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकार गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनवण्याच्या घोषणा करत असले, तरी जिल्ह्यातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. अहेरी येथे मंजूर झालेले डायलिसिस केंद्र अद्याप कार्यान्वित न झाल्याने सिरोंचा, भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील रुग्णांना गडचिरोली किंवा चंद्रपूर येथे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
राज्य सरकारने या गंभीर परिस्थितीची तात्काळ जबाबदारी स्वीकारून ‘रोटा’ लसीचा त्वरित पुरवठा करावा, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी आणि नवजात बालकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवावा, अन्यथा काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता रोटा लसीचा पुरवठा हा थोडा फार कमी झाला होता पण आम्ही 2 हजार लसीचा पुरवठा मागितला आहे.
महिला व बाल रुग्णालयात विचारणा केली असता अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके यांनी सांगितले की रोटा लसीचा पुरवठा स्टेट लेवल वरून होत असतो,आम्ही पुन्हा पुरवठा करण्याची मागणी केल्यावरून आम्हाला 30 लस पुरवठा करण्यात आली असून त्यापैकी आज 14 लस शिल्लक आहे.




