Home राजकीय आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव… प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय…

आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव… प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय…

0
1084

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि हाय प्रोफाईल हॉट सीट ठरलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला असून, या निकालाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे.
२ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १, ४ आणि ११ मधील एका-एका उमेदवाराची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ही रखडलेली निवडणूक २० डिसेंबर रोजी पार पडली. या तीन प्रभागांपैकी सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत प्रभाग क्रमांक ११ मध्ये झाली.

प्रभाग ११ मध्ये भरडकर विरुद्ध तिडके – हाय प्रोफाईल सामना…
प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार लीलाधर भरडकर आणि भाजपचे उमेदवार अनिल तिडके यांच्यात थेट लढत होती. ही लढत निवडणुकीपूर्वीपासूनच शहरभर चर्चेचा विषय ठरली होती.
लीलाधर भरडकर हे स्वतः याच प्रभागातील रहिवासी असून, त्यांनी याच प्रभागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले आहे. आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या निधीतून प्रभागात लाखो रुपयांची विकासकामे करून, नागरिकांच्या अडीअडचणी सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याच विकासकामांमुळे मतदारांचा कौल एकतर्फी भरडकर यांच्या बाजूने गेला, हे मतदान यंत्रातील आकड्यांमधून स्पष्ट झाले.

भाजपचा ‘आयात’ उमेदवार ठरला अपयशी…
भाजपकडून प्रभाग ११ मध्ये बाहेरील वॉर्डातून आणलेले आयात उमेदवार अनिल तिडके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, याच प्रभागातील एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते विवेक बैस यांना डावलण्यात आल्याने पक्षात तीव्र नाराजी निर्माण झाली. या नाराजीचा फटका थेट निवडणूक निकालात दिसून आला.

आमदारांचे प्रयत्नही ठरले फोल…
स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मागील आठ दिवस प्रभाग ११ मध्ये ठाण मांडून भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले. दुचाकीवर फिरून,आपला चेहरा लपवीत हेल्मेट घालून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही आमदारांना आपला लाडका उमेदवार किंवा पक्षाची महिला उमेदवार निवडून आणण्यात अपयश आले.

मताधिक्याचा विक्रम – भरडकरांचा दणदणीत विजय…
प्रभाग क्रमांक ११-ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लीलाधर भरडकर यांना तब्बल १७७१ मते मिळाली, तर भाजपचे पराभूत उमेदवार अनिल तिडके यांना केवळ ४१२ मते मिळाली. हा मतांचा फरक नगरपालिकेतील सर्व प्रभागांमध्ये सर्वाधिक असून, भरडकर यांनी सर्वाधिक आघाडी घेणारे नगरसेवक म्हणून विक्रम नोंदवला आहे.

याच प्रभागात भाजपच्या महिला उमेदवार पायल अलाम कोडापे यांचा सुद्धा दारुण पराभव झाला. याउलट, लीलाधर भरडकर यांनी आपल्या महिला सहउमेदवारालाही विजयी करून दाखवत नेतृत्वाची ताकद सिद्ध केली.
भाजपची एकहाती सत्ता – स्वप्नच ठरले
भाजपला २७ पैकी केवळ १५ नगरसेवक निवडून आणता आले असून, हा निसटता विजय मानला जात आहे. एकहाती सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न यावेळी पूर्णपणे धुळीस मिळाले आहे.

नगराध्यक्ष पदाचा निकाल…
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी ४९५८ मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी रवींद्र नैताम खोब्रागडे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

राजकीय समीकरणे बदलली…

मागील निवडणुकीत केवळ एक उमेदवार असलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी ६ जागा, तर याआधी एकही नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागा जिंकून मोठी झेप घेतली आहे.

भरडकरांची प्रतिक्रिया…
“संपूर्ण भाजपा माझ्या विरोधात कामाला लागलेली असतानाही केवळ मतदारांच्या आशीर्वादाने मी सर्व नगरसेवकांपैकी सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालो,” अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार लीलाधर भरडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपमध्ये आत्मपरीक्षणाची चर्चा...
योग्य उमेदवारांना उमेदवारी न दिल्यामुळेच भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, अशी चर्चा आता भाजपच्या गोटात सुरू झाली आहे. कार्यपद्धतीत बदल न केल्यास याचा फटका येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही बसू शकतो, अशी शंका कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here