Home सामाजिक अहेरीत तालुका विज्ञान प्रदर्शनीचे दिमाखात उद्घाटन — ग्रामीण-आदिवासी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला...

अहेरीत तालुका विज्ञान प्रदर्शनीचे दिमाखात उद्घाटन — ग्रामीण-आदिवासी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला नवे व्यासपीठ…

0
95

 

अहेरी :

शिक्षण विभाग, पंचायत समिती अहेरी आणि भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनीमुळे तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीला चालना मिळाली असून त्यांच्या कल्पकतेला भक्कम व्यासपीठ मिळाले आहे.

या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव अब्दुल जमीर हकीम हे होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार दाते साहेब, गट विकास अधिकारी गणेश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी निखिल गुरव, दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शाहीन हकीम, प्राचार्य शाहीद शेख, गट शिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम (महागाव), केंद्रप्रमुख उमेश चिलवेलवार, प्रा. डॉ. रमेश हलामी, प्राचार्य गजानन लोनबले तसेच राहूड सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात अब्दुल जमीर हकीम यांनी विज्ञान शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय सर्वांगीण विकास अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे ही काळाची गरज असून अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता समाजातील समस्यांवर वैज्ञानिक उपाय शोधावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शाहीन हकीम यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांची नवकल्पना आणि सर्जनशीलता समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन अधिक सुरक्षित, सुलभ व समृद्ध करण्यासाठी व्हावा, असे त्यांनी सांगितले. विशेषतः मुलींच्या शिक्षणात विज्ञानाची भूमिका महत्त्वाची असून अधिकाधिक मुलींनी विज्ञान क्षेत्रात करिअर घडवावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

उद्घाटनप्रसंगी सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचारसरणी आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होते, असे सांगत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शाहीद शेख यांनी केले. त्यांनी तालुका विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत तालुक्यातील विविध शाळांमधून सादर झालेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पिंपळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुनतकर यांनी मानले.

या तालुका विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, आरोग्य, शेती, ऊर्जा संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांवरील समाजोपयोगी व उपयुक्त विज्ञान प्रकल्प सादर केले. मान्यवरांनी प्रत्येक प्रकल्पाला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here