Home ब्रेकिंग न्यूज कोनसरी प्रकरणात नवे वळण : काल धनेश जुमनाके यांची तक्रार, आज प्रत्युत्तरादाखल...

कोनसरी प्रकरणात नवे वळण : काल धनेश जुमनाके यांची तक्रार, आज प्रत्युत्तरादाखल गावकऱ्यांची पोलिसांत धडक..बोगस ठराव आणि प्रतिज्ञा पत्र आले बाहेर…??.

0
876

 

गडचिरोली | प्रतिनिधी

 

चामोर्शी तालुक्यातील मौजा कोनसरी येथे प्रस्तावित लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या स्टील प्रकल्पासाठी झालेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेभोवतीचा वाद आणखी चिघळला असून, या प्रकरणात आता दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणात काल सायंकाळी (दि. १८ डिसेंबर २०२५) कंपनीशी संबंधित कर्मचारी धनेश मोतीराम जुमनाके यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी कोनसरी येथील काही ग्रामस्थांवर जातीवाचक शिवीगाळ, बेकायदेशीर अडवणूक, धमकी, सार्वजनिक अपमान आणि मानसिक त्रास केल्याचा आरोप केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आज (दि. १९ डिसेंबर २०२५) याच प्रकरणात प्रत्युत्तर म्हणून कोनसरी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आष्टी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ग्रामस्थांनी स्टील प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना खोटा व बनावट ग्रामसभा ठराव तयार करून त्याचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दि. ४ मार्च २०२३ रोजी ग्रामसभा झाल्याचे भासवून बनावट ठराव तयार करण्यात आला, मात्र माहितीच्या अधिकाराअंतर्गत ग्रामपंचायत कोनसरीकडून दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या पत्रात त्या दिवशी कोणतीही ग्रामसभा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यास ग्रामसेवकांच्या नोंदवलेल्या निवेदनांतूनही दुजोरा मिळतो.

 

या बनावट ठरावाच्या आधारे सुमारे ३५० जमीनधारकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे अनेक कुटुंबांवर अन्याय, दबाव व शोषण झाले, घरे उद्ध्वस्त झाली आणि मोठ्या मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

गावकऱ्यांनी या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६७-४६८ (बनावट कागदपत्रे), ४७१ (बनावट दस्तऐवज वापरणे) आणि १२०-ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा नोंदवून सखोल चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

काल दाखल झालेली जातीवाचक अत्याचाराची तक्रार आणि आज दाखल झालेली बनावट ग्रामसभा ठरावाबाबतची प्रत्युत्तर तक्रार—या दोन्ही घटनांमुळे कोनसरीतील स्टील प्रकल्प आणि जमीन अधिग्रहण प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

सदर प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकारी,जिल्हा खनीज अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here