Home विशेष दुबई एशियन पॅरा गेम्समध्ये श्वेता कोवेचा सुवर्णांकीत पराक्रम; गडचिरोली जिल्ह्याची लेकीने देशाचा...

दुबई एशियन पॅरा गेम्समध्ये श्वेता कोवेचा सुवर्णांकीत पराक्रम; गडचिरोली जिल्ह्याची लेकीने देशाचा मान उंचावला…

0
200

 

 

गडचिरोली/दुबई | प्रतिनिधी :

दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील कढोली गावची कन्या कु. श्वेता भास्कर कोवे हिने ऐतिहासिक कामगिरी करत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि सांघिक गटात कांस्यपदक पटकावत श्वेताने देशासह जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.

 

वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी असलेल्या श्वेताचा कढोली गावापासून थेट दुबईपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. दिव्यांगत्वावर मात करत कठोर मेहनत, प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश संपादन केले असून, तिची ही कामगिरी असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे.

 

भारतासाठी पदके पटकावलेल्या या खेळाडूच्या उल्लेखनीय यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळाचे सचिव अब्दुल जमीर हकीम उर्फ बबलू भैय्याजी तसेच दृष्टी फाउंडेशन, अहेरी यांच्या अध्यक्षा सौ. शाहीन ताई हकीम यांनी श्वेताचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

श्वेताच्या या यशामागे तिचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेले महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक डॉ. श्याम कोरडे यांचे विशेष मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण प्रेरणेच्या बळावर श्वेता आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरली.

 

या ऐतिहासिक यशाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई आणि सुशील अवसरमोल यांनीही श्वेताचे अभिनंदन केले. तिची चिकाटी, मेहनत आणि शिस्त हीच तिच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

श्वेता कोवेच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, तिचा पराक्रम ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी दिशा देणारा ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here