आलापल्ली | प्रतिनिधी
आलापल्ली वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बोगस मजूर दाखवून जवळपास तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याचे सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे यांनी 55 दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. आलापल्ली आणि पेरमिली वनक्षेत्रात बनावट मजूर दाखवून, खोटे मस्टर तयार करून आणि रोजंदारीचे पैसे उचलून हा भ्रष्टाचार झाल्याचे दस्तऐवज तक्रारीसोबत जोडले आहेत.
दुकानदार, फर्निचर कामगार ‘मजूर’ दाखवून पैसे लाटले?
तक्रारीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शंकर ढोलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानात काम करणारे लोक,फर्निचर व्यवसाय करणारे कामगार,वनकामाशी काहीही संबंध नसलेले व्यक्ती यांना बनावट स्वरूपात वनकामगार दाखवून त्यांच्या नावाने पैसे काढले गेले. या बनावट मस्टरमुळे कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांनी वाटून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

1800 पानांचे पुरावे दिले तरी चौकशी ढिसाळ?
तक्रारदाराने जवळपास 1800 पानांचे कागदी पुरावे चौकशी अधिकाऱ्याकडे जमा केले होते. तरीही,मूळ तक्रारीतील 600 बोगस मजुरांच्या ऐवजी
फक्त 45 जणांची नवी यादी तयार करून त्यांचीच चौकशी केल्याचा आरोप ढोलगे यांनी केला आहे.
यातून वनपरिक्षेत्र अधिकारी गणवीर यांना वाचवण्याचा प्रयत्न चौकशी अधिकारी डीसीएफ गणेश पालोडे करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दोषी अधिकारी त्याच ठिकाणीच नियमित; चौकशी निष्पक्ष कशी होणार?
सध्या तक्रारीतील आरोपी वनपरिक्षेत्र अधिकारी गणवीर हे आलापल्ली येथे नियमित आणि पेरमिली येथे प्रभारी म्हणूनच काम पाहत आहेत.
दोषी अधिकाऱ्याला त्याच जागेवर ठेवून चौकशी केल्यास चौकशी निष्पक्ष होईल का? असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्याची बदली न करता चौकशी चालू ठेवल्याने वनविभागाच्या हेतूंवर शंका निर्माण झाली आहे.
मुख्य वनसंरक्षक अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले की “चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपपत्र दाखल करून कारवाई केली जाईल.”
परंतु, त्याच वेळी त्यांनी असेही म्हटले की “संबंधित अधिकाऱ्याला हटवण्याचा किंवा कारवाईचा मला अधिकार नाही; सध्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही.” ही भूमिका धक्कादायक आणि संशय निर्माण करणारी असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
मानवाधिकार संघटनेला ही तक्रार; कडक कारवाईची मागणी
राज्य मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनीही या प्रकरणातील दस्तऐवजांचे अवलोकन केले असून, त्यांनी मुख्य वनसंरक्षकांना भेटून दोषी अधिकारी गणवीर यांना तात्काळ बडतर्फ करण्याची कठोर कारवाई करण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे.
वनविभागावरच विश्वास ठेवायचा कसा? – तक्रारदारांचे प्रश्न…
गंभीर आरोप, प्रचंड प्रमाणातील पुरावे आणि मानवाधिकार संघटनेची हस्तक्षेपाची मागणी असूनही वनविभागात कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदार शंकर ढोलगे यांनी संताप व्यक्त केला.
ते म्हणाले की “तीन कोटींचा पैसा गडप झाला, आणि अधिकारी मिळून वाटणी करून बसले. कोणत्या वन अधिकाऱ्यावर विश्वास ठेवायचा?”
हिवाळी अधिवेशनात वनमंत्र्यांकडे निवेदन देणार..
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वनमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याची माहितीही शंकर ढोलगे यांनी दिली आहे.
एकंदरीत, आलापल्ली वनविभागातील हा तीन कोटींचा बोगस मजूर घोटाळा राज्याच्या चौकशी यंत्रणेसाठी मोठे आव्हान असून, यात कोणावर कारवाई होते व खरं सत्य कितपत उघडे पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




