Home ब्रेकिंग न्यूज गोंडवाना विद्यापीठ परिसरात बिबट्या चा वावर; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

गोंडवाना विद्यापीठ परिसरात बिबट्या चा वावर; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

0
754

 

 

गडचिरोली :

गोंडवाना विद्यापीठाच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात बिबट्या (वन्य प्राणी) दिसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार दिवसांपूर्वी रात्री गस्त घालत असलेल्या सुरक्षारक्षकाला बिबट्या वन्यप्राणी दिसल्याची माहिती समोर आली असून, या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

 

दररोज हजारो विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी विद्यापीठात ये-जा करतात. अशा ठिकाणी वन्यप्राण्याचा वावर दिसल्याने सर्वांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

 

 

कोट्यवधींच्या इमारती, पण सुरक्षा फेंसिंगचा अभाव!

विद्यापीठाच्या बाहेरील कंपाऊंडवर अद्याप लोखंडी तारांचे फेंसिंग करण्यात आलेले नाही.

कोट्यवधी रुपयांच्या इमारती उभारूनही सुरक्षेची साधने अपुरी असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, प्रशासनाने वर्षानुवर्षे या बाबीकडे दुर्लक्ष केले असून, आता या निष्काळजीपणाचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत.

शासकीय कार्यालयांच्या जवळ बिबट्या चा वावर — प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न…

 

गोंडवाना विद्यापीठ परिसराच्या काही अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, आरटीओ विभाग, एमआयडीसी क्षेत्र यांसारखी प्रमुख शासकीय कार्यालये आहेत.

इतक्या दाट लोकवस्तीच्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात वन्यप्राण्यांचा वावर दिसणे ही अतिशय चिंताजनक बाब ठरत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “इतक्या संवेदनशील परिसरात शेरसारख्या प्राण्याचा वावर असूनही वन विभाग आणि स्थानिक प्रशासन शांत का आहे?”

 

विद्यार्थ्यांचा संताप — ‘आमच्या जीवाशी खेळ का?’

 

काही विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. बिबट्या दिसल्याची घटना घडून चार दिवस झाले तरी प्रशासनाने ती माहिती लपवून ठेवली होती.

आज विद्यापीठ गेटवर लावलेल्या सूचनेवरून ही बाब माध्यमांसमोर आली…

“विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. ही निष्काळजी वृत्ती आमच्या जीवावर बेतू शकते,” — विद्यार्थ्यांचा संताप.

 

 

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे स्पष्टीकरण…

 

या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की “चार दिवसांपूर्वी मी एका महत्त्वाच्या विषयावर मुंबई येथे गेलो असताना, रात्रीच्या पाळीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला बिबट्या (शेरसदृश वन्यप्राणी) दिसल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर मी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले व ताबडतोब दखल घ्यावी अशी विनंती केली.

वन विभागाने विद्यापीठाच्या सुरक्षा भिंतीच्या बाहेरील भागात पिंजरे लावून वन्यप्राण्याला पकडण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचे कळविले आहे.”

 

कुलगुरूंनी पुढे सांगितले की “हजारो च्या संख्येत असलेले विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मी तातडीने वन विभागाला पत्र पाठवून संपूर्ण सुरक्षा भिंतीवर लोखंडी तारांचे कुंपण आणि जंगली जनावरांना अटकाव करणारी यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यापीठ प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेतली असून सर्व सुरक्षा उपाय सुरू केले आहेत.”

 

राज्य सरकारकडून चौकशीची मागणी…

 

विद्यार्थ्यांच्या पालकांकडून राज्य सरकार आणि वन विभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून शेर किंवा बिबट्याला पकडण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर लक्ष घालून विद्यापीठ परिसरात कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

स्थानिक नागरिकांचा प्रशासनावर रोष…

 

“लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या अशा घटना घडूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

 

गोंडवाना विद्यापीठासारख्या उच्च शिक्षण संस्थेत वन्यप्राण्याचा वावर दिसणे हे केवळ सुरक्षेचे अपयश नाही,तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण आहे.

कुलगुरूंनी तातडीने दखल घेतली असली तरी, या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर आणि विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here