गडचिरोली –
गडचिरोली नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नगर विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या पिपरे दाम्पत्याचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या योगिता पिपरे यांच्या दावेदारीला आता जनतेचा जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे.
मागील पाच वर्षांत नगर पालिकेच्या माध्यमातून झालेली विकासकामे ही मागील तीस वर्षांच्या तुलनेत भक्कम आणि प्रभावी असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील नगर पालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या 5 शाळांचे नवीन बांधकाम,शहरातील 50 ते 60 ओपन स्पेस चे सौंदर्यीकरण करून त्याठिकाणी व्यायामाचे साहित्य लावणे,कारगिल चौकातील सैनिक स्मारकाचे बांधकाम,गटार लाईनचे शंभर कोटींचे काम, सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आखलेले धोरण या महत्त्वाच्या कामांची अंमलबजावणी ही पिपरे दाम्पत्याच्या पुढाकारामुळेच शक्य झाली, असे सर्वत्र बोलले जाते.
भाजपने आतापर्यंत एकनिष्ठ आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून यश मिळवले आहे. मात्र, आता काँग्रेस पक्षाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून आयात केलेल्या एका धनाढ्य महिलेला उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होताच काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून काँग्रेस पक्षाची शहरात ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाला तुल्यबळ असलेल्या योगिता पिपरे यांची दावेदारी नाकारल्यास, भाजपला सत्ता गमवावी लागू शकते, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.
राजकारणात प्रावीण्य, अनुभव आणि लोकसंपर्क या तिन्ही गुणांचा समन्वय असलेल्या योगिता पिपरे या शहरातील महिलांच्या नेतृत्वाचे प्रतीक बनल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास अधिक गतीमान होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
राजकारणात नवख्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपला महागात पडू शकतो, असा इशारा स्थानिक राजकीय जाणकारांनी दिला आहे. कारण गडचिरोली नगर पालिकेत सत्ता स्थापन करायची असेल, तर एकनिष्ठ आणि विकासाभिमुख कार्यकर्त्यांवरच विश्वास ठेवणे हा पक्षासाठी हिताचा निर्णय ठरेल, असा सर्वसामान्यांचा एकमुखी स्वर आहे.
एकंदरीतच, भाजपने जर योग्य आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवला, तर गडचिरोलीत पुन्हा एकदा भगवा फडकण्यास कुणीही अडथळा आणू शकणार नाही, हे निश्चित!




