आरोग्य विभागाचे आंदोलन समाजाला परवडणारे नाही…
वेतन थकबाकी आणि मागण्या न पूर्ण झाल्याने कामगारांचा संताप; रुग्णालयातील सेवा ठप्प होण्याची शक्यता…
गडचिरोली, दि. १८ ऑक्टोबर :
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे कार्यरत एम.व्ही.जी. (महाराष्ट्र विकास ग्रुप) आणि ओझोन असोसिएट कंपनी अंतर्गत कार्यरत सर्व कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन आणि कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कामगार प्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच दोन्ही कंपनींच्या संचालकांना याबाबत लेखी निवेदन दिले असून, चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न अद्याप न सुटल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगितले आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून नियमित पूर्ण वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. या संदर्भात आधीच कामगारांनी अनेक वेळा चर्चा व निवेदन दिले होते. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने संतप्त कामगारांनी एकमुखाने कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे.
या कामबंद आंदोलनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता, देखभाल आणि इतर सहाय्यक सेवा प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रुग्णसेवांवर थेट परिणाम होऊ शकतो.
कामगारांनी स्पष्ट केले आहे की, “जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि थकबाकी वेतन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर रुग्णालयातील आवश्यक सेवांचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ मध्यस्थी करून कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.




