गडचिरोली :
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मला पराभूत करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून माझ्याच पुतण्याला माझ्या विरोधात उभे केले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, माजी मंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. ते आज चामोर्शी येथे झालेल्या सभेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘जनकल्याण यात्रा’चे आयोजन चामोर्शी येथे करण्यात आले होते. या सभेत धर्मरावबाबांनी भाजपवर जोरदार टीका करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.
आत्राम म्हणाले, “भाजपने पाच कोटी रुपये देऊन माझ्याच पुतण्याला माझ्याविरोधात उभे केले, मात्र मतदारांनी मला जिंकवले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मी एक तुकडादेखील देणार नाही. माझ्या मतदारसंघात कोणत्या जागा आम्ही लढवायच्या आणि कुणाला किती द्यायच्या हे मीच ठरवणार.”
“शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम” — आमदार अमोल मिटकरी
याच कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी महायुती सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली आहे. पुढेही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. गडचिरोली हा संघर्ष आणि क्रांतीचा जिल्हा असून, या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे.”
स्थानिकांच्या हक्कासाठी ठाम भूमिका…
आत्राम यांनी पुढे सांगितले, “कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर ते खपवून घेतले जाणार नाही.”
सभेला जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
महायुतीत बेबनाव उफाळला….
दोन दिवसांपूर्वीच धर्मरावबाबांनी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या विकासकामांवरील हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी भाजपवर निशाणा साधल्याने महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या यात्रेत सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर, विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, माजी जि.प. सदस्य नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम, रिंकू पापडकर, अँड. डिंपल उंदिरवाडे, डॉ. नोमेश जुवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
