अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांवरून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्यावर टीका…
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांमध्ये सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार आत्राम यांनी जयस्वाल यांच्यावर केवळ विकासकामांमध्येच नव्हे, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विकासकामातील निधी आणि अधिकारांच्या वाटपावरून शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वाद आता उफाळून आला असून, या अंतर्गत संघर्षामुळे महायुतीच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवूनही, गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर करत नाहीत, अशी टीका वारंवार करण्यात येत आहे.
विकासकामांच्या ठप्प स्थितीमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, या निष्क्रियतेविरोधात काँग्रेसने अनेक वेळा आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे, असंतोष केवळ विरोधकांपुरता मर्यादित नसून, आता तो महायुतीच्या आतही वाढू लागला आहे. सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्तक्षेपावर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत अंतर्गत संघर्ष अधिक गडद झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सर्व काही ‘आलबेल’ नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याच्या प्रशासनिक आणि विकासात्मक स्थितीकडे लक्ष देऊन तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोर धरत आहे.
