गडचिरोली : गडचिरोली शहरालगतच्या डोंगरगाव शिवारात मैत्रीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहिणीबाबत आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केल्याच्या रागातून एका अल्पवयीन युवकाने आपल्या जिवलग मित्राची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून युवकांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि नशाखोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत युवकाचे नाव बादल नकटुजी कोसनकर (वय १७) असे असून, पोलिसांनी आरोपी अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत बादल आणि आरोपी युवक हे दोघेही घनिष्ठ मित्र होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी बादलने आरोपीच्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केल्याने आरोपीच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला होता. त्याने तत्काळ प्रतिक्रिया न देता बादलचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपीने बादलला “गांजा ओढण्यासाठी जाऊ” असे आमिष दाखवत गुरवळा मार्गावरील जंगल परिसरात नेले. दोघेही जंगलातील सुनसान ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीने परिसरात कोणीही नसल्याची खात्री केली आणि मागून अचानक कुऱ्हाडीने बादलवर हल्ला चढविला. डोक्यावर आणि पाठीवर जोरदार वार झाल्याने बादल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न…
हत्या केल्यानंतर आरोपी युवकाने स्वतःला वाचविण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. तो स्वतःच फिर्यादी बनून पोलिसांकडे गेला आणि पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून तीन अज्ञात व्यक्तींनी बादलची हत्या केल्याचे सांगितले.
मात्र, त्याच्या जबाबातील विसंगती पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांचेही मोबाईल तपासले. तांत्रिक तपासणी आणि कसून चौकशीदरम्यान आरोपी युवक गोंधळला आणि अखेर त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली.
गडचिरोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करीत आहेत.
घटनेमुळे वाढत्या नशाखोरीवरही प्रश्नचिन्ह…
या घटनेमुळे परिसरातील वाढत्या नशाखोरीचा मुद्दाही समोर आला आहे. आरोपी आणि मृत युवक हे दोघेही जंगलात गांजासारख्या अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी जात असल्याची बाब उघड झाल्याने जिल्ह्यात युवकांमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, युवकांपर्यंत गांजा आणि इतर अमली पदार्थ सहजपणे कसे पोहोचत आहेत, यामागे कोणाचे संरक्षण आहे आणि नशाविक्रीचा हा अवैध व्यवसाय कोणाच्या भरोशावर सुरू आहे, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ खून प्रकरणाचा तपास न करता जिल्ह्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेकडे गंभीरतेने पाहण्याचे आवाहन केले असून, युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी पुढे येत आहे.



