Home सामाजिक अमिर्झा गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी अरविंद कात्रटवार यांचा पुढाकार…स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त टँकरद्वारे पिण्याच्या...

अमिर्झा गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी अरविंद कात्रटवार यांचा पुढाकार…स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; नागरिकांना दिलासा…

0
113

 

 

गडचिरोली.:मौशीखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांनी पुढाकार घेत नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

सध्या जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई गंभीर बनली आहे. अमिर्झा गावातील विहिरी, तलाव आणि हातपंपांची पाण्याची पातळी घटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. ही परिस्थिती लक्षात घेत अरविंद कात्रटवार यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत गावातील विविध वॉर्डांमध्ये टँकरद्वारे मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला.

 

या उपक्रमामुळे विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांनी अरविंद कात्रटवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील महिला, युवक आणि कात्रटवार मित्रपरिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना अरविंद कात्रटवार म्हणाले, “पाणी ही निसर्गाची अनमोल देणगी असून ‘जल हेच जीवन’ हे सत्य आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे. भविष्यातील पिढ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. वाढते औद्योगिकीकरण, जंगलतोड आणि भूजलाचा अमर्याद उपसा यामुळे अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थेंब जपला पाहिजे.”

 

ते पुढे म्हणाले की, “उन्हाळ्यात नागरिकांसोबतच जनावरांच्याही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. पाणीटंचाई दूर करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असली तरी सामाजिक दायित्व म्हणून आपणही पुढे येणे आवश्यक आहे. जलसंवर्धन म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि योग्य वापर. पावसाचे पाणी साठवणे, जलप्रदूषण रोखणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज आहे.”

 

या प्रसंगी देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, राहुल सावरकर, नंदू सडमाके, दिलीप वलादे, मधुकर बावणे, गिरीश टेकाम, साहिल कोहपरे, विकास ठाकूर, कैलास लाडे, पुरुषोत्तम कुमरे, बालाजी चापले, गणेश झंझाड, विश्वनाथ भनारकर, विलास ढोलणे, दीपक कोसनशिले, महेश खेडेकर, जगण चापले, निकेश लोहंबरे, प्रकाश भजभुजे, महेश भोयर, मिलिंद आत्राम, मंथन परचाके, बंटी पेंदाम, अजित समर्थ, प्रकाश ठाकरे, शुभम समर्थ, सुरेश कोलते, विनोद खेवले, प्रज्वल वट्टे, नेत्रेश कोलते, मयुर भोयर, मोहित लाजूरकर, अभिजित खेवले, अरुण पेंदाम, नितेश बुराडे, राजेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here