गडचिरोली (प्रतिनिधी):
कोरोना महामारीच्या भीषण काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचारिकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत असल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “केलेल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी महिलांना आंदोलन करावे लागते, हा सरकारचा निर्लज्जपणा आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया प्रा. कॉ. रमेशचंद्र दहिवडे यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात संपूर्ण देश भीतीच्या छायेत होता. नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते, नातेसंबंधही तुटल्यासारखे झाले होते. अशा गंभीर परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घराघरांत जाऊन आरोग्य सेवा, जनजागृती आणि सर्वेक्षणाचे काम प्रामाणिकपणे केले. त्या काळात दरमहा 1000 रुपये कोरोना भत्ता देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. मात्र 24 महिन्यांचे काम करून घेतल्यानंतर केवळ एक महिन्याचा भत्ता देण्यात आला असून उर्वरित 23 महिन्यांचे सुमारे 23 हजार रुपये अद्याप थकीत आहेत.
या अन्यायाविरोधात आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. “थकीत कोरोना भत्ता तात्काळ द्या”, “फसवणूक बंद करा”, “केलेल्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे म्हणाले, “काम करून घेऊन नंतर तोंड लपवणे ही शासनाची सवय झाली आहे. मंदिर बांधकाम आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध होतात, मात्र कष्टकरी महिलांच्या मेहनतान्यासाठी निधी नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.”
जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, “मोबदला देण्याबाबत चार वेळा पत्रे काढण्यात आली, तरीही अंमलबजावणी का झाली नाही? जर देयक देण्याची तयारी नव्हती, तर पत्रे काढण्यामागचा उद्देश काय?”
कॉ. अरुण भेलके यांनीही सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “अच्छे दिनाचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याचा फायदा केवळ काही घटकांनाच झाला आहे. सामान्य कामगारांना अजूनही हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.”
आंदोलनानंतर अरुण भेलके व अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
या वेळी कॉ. अरुण लाटकर (नागपूर), सुनंदा बावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वला उंदीरवाडे, ललिता केदार, विठाबाई भट, सुमन टोकलवार, रंजना टेंभुर्णे, छाया रामटेके, विठोबा एकोनकर, भारती रामटेके, भागीरथा दूधबावरे, कौशल्या गौरकार, माया शेडमाके, बेबीताई त्रिनगरीवार आणि संगीता वडलाकोंडावार यांनी विशेष परिश्रम घेतले.




