गडचिरोली :
समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या मून परिवाराने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. गडचिरोली येथील लड्डू विशेष दत्तक संस्थेमध्ये वास्तव्यास असलेल्या नवजात बालकांसाठी अत्यावश्यक असलेले दूध पावडर उपलब्ध नसल्याची माहिती मिळताच मून दांपत्याने तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
संस्थेमध्ये सध्या एक ते दीड महिन्यांच्या वयोगटातील नवजात बालके असून, त्यांच्यासाठी Nestlé कंपनीचे ‘Lactogen Pro 1’ दूध पावडर आवश्यक होते. मात्र निधीअभावी हे दूध उपलब्ध होत नसल्याने बालकांच्या संगोपनात अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेत मून परिवाराने स्वतः संस्थेला भेट देत किमान एक महिना पुरेल इतके ३० डबे लॅक्टोजेन दूध पावडर भेट म्हणून सुपूर्द केले.
हा मदतीचा उपक्रम बाल कल्याण समिती सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नागपूर येथून गडचिरोलीपर्यंत दूध पावडर पोहोचविण्यास सहकार्य करणारे श्री. राहुल भाऊ जवादे यांचे मून परिवाराने विशेष आभार मानले.
या प्रसंगी सौ. ग्रीष्मा विवेक मून (जिल्हा महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या), वर्षा मनवर (अध्यक्षा, बाल कल्याण समिती), दिनेश बोरकुटे व काशीनाथ देवगडे (सदस्य, बाल कल्याण समिती), नशीब जांभूळकर (अधीक्षक, विशेष दत्तक संस्था), विवेक विरदास मून (सामाजिक कार्यकर्ते), तसेच विकल्प मून, संकल्प मून, कु. डिंपल सहारे (परिचारिका) आणि संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मून परिवाराच्या या उपक्रमामुळे नवजात बालकांच्या संगोपनासाठी मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील इतरांनीही अशा सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.




