गडचिरोली | प्रतिनिधी (दि. 26 मार्च)
गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे गुरुवारी (दि. 26 मार्च) मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. एका अनियंत्रित झालेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेड्स उडवत तब्बल 100 ते 150 फुटांपर्यंत सरपटत जाऊन पलटी मारली. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन हे मारुती सुझुकी कंपनीचे सिलेरिओ मॉडेल असून वाहन क्रमांक MH-31-EK -5991 असा आहे. अपघातावेळी वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते. या वाहनाचा चालक देव राहुल महात्मे (वय 22 वर्ष) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला व पाठीला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक उपचारात निष्पन्न झाले असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाने निष्काळजीपणे व वेगात वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित वाहन कॉम्प्लेक्सकडून गडचिरोली शहराच्या दिशेने येत असताना कारगिल चौकाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूच्या बॅरिकेड्सवर धडकले. त्यानंतर वाहन चौकाच्या मध्यभागी पलटी झाले आणि गाडीचे चारही चाक वरच्या दिशेने झालेले दिसून आले.
या अपघातात नगरपालिकेचे दिशादर्शक दोन फलक तसेच महामार्गालगत उभारलेले सहा ते सात लोखंडी बॅरिकेड्सचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नगरपरिषद व महामार्ग प्रशासनाचे मिळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. विशेष म्हणजे, रामनवमी सणामुळे अनेक नागरिक घराबाहेर न पडल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. काहींनी तर श्रीरामाच्या कृपेनेच चालकाचा जीव वाचल्याची भावना व्यक्त केली.
अपघातावेळी चालक नशापाणी घेतलेला होता का, याबाबतही प्रत्यक्षदर्शींनी शंका व्यक्त केली असून याबाबतची खात्री पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस विभागाकडून सुरू असून तपासानंतरच अधिकृत व सविस्तर माहिती समोर येणार आहे.




