गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात नगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईत लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ऑटोस्टॅंडकडे दुर्लक्ष करून एका बुक डेपोच्या काउंटरवरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप संबंधित दुकानदाराने केला आहे.
नगरपालिकेच्या माहितीनुसार, चौक परिसरातील ऑटो स्टॅंडजवळील सुबोध बुक डेपो समोरील लोखंडी व लाकडी बनावटीचा काउंटर फूटपाथवर ठेवण्यात आला होता. हा काउंटर रस्त्यापासून सुमारे दीड ते दोन फूट उंच असलेल्या फूटपाथवर असल्याने ऑटोचालकांना अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी ऑटो संघटना तसेच काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने संबंधित काउंटर उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकून जप्त केला.
या संदर्भात नगरपालिकेचे अभियंता श्रीधर महिंद यांनी सांगितले की, ऑटोचालकांकडून सतत तक्रारी येत असल्यामुळे संबंधित काउंटर हटविण्याची कारवाई करण्यात आली.
मात्र सुबोध बुक डेपोचे संचालक नागेश बनसोड यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितले की, ज्या काउंटरवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये त्यांच्या स्टेशनरी दुकानातील सुमारे २५ हजार रुपयांचे साहित्य ठेवलेले होते आणि त्या काउंटरला कुलूपही लावलेले होते. “माझे दुसरे दुकान त्या ठिकाणापासून अगदी जवळ असतानाही मला कोणतीही लिखित नोटीस किंवा पूर्वसूचना न देता नगरपालिकेने बळजबरीने काउंटर उचलून नेला. यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले,” असे त्यांनी सांगितले.
बनसोड यांनी पुढे आरोप केला की, इंदिरा गांधी चौक परिसरात अनेक ऑटोचालक रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक तसेच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतानाही वाहतूक विभाग किंवा प्रशासनाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
“हजारो लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अव्यवस्थित ऑटोस्टॅंडवर कारवाई न करता फूटपाथच्या कडेला ठेवलेल्या माझ्या काउंटरलाच टार्गेट करण्यात आले. ही कारवाई अन्यायकारक असून याबाबत मी नगरपालिकेविरुद्ध कायदेशीर पावले उचलणार आहे,” असा इशारा बनसोड यांनी दिला.
दरम्यान, या कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलीस यंत्रणेचाही वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच इंदिरा गांधी चौक परिसरातील वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या घटनेमुळे शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात असल्याची चर्चा रंगू लागली असून प्रशासन या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




