धानोरा तालुक्यात चारित्र्याच्या संशयातून घडले दुर्दैवी कुटुंबीय हत्याकांड…
धानोरा : चारित्र्यावर संशय आणि त्यातून निर्माण झालेला कौटुंबिक वाद टोकाला गेल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची थरारक घटना धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या रुपीनगट्टा गावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे त्या दाम्पत्याची चार चिमुकली मुले आणि वृद्ध वडील पूर्णतः निराधार झाले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेत राकेश सुकना कुजूर (वय ३७) याने पत्नी कनिष्ठा कुजूर (वय ३२) हिचे दगडावर डोके आपटून निर्घृणपणे हत्या केली. पेंढरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील रुपीनगट्टा येथील राकेशच्या शेतात धान्याची मळणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पती-पत्नी शेतावर गेले होते. त्यावेळी राकेशचे वडील व मुलगी शेतातच होते. दुपारी दोघांनी घराकडे निघाल्याचे सांगितले; मात्र सायंकाळी वडील व मुलगी घरी परतल्यावर राकेश व कनिष्ठा घरी न आढळल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली.
त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू करण्यात आला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मोठ्या दगडावर रक्ताचे ठसे दिसून आल्याने दगडावर डोके ठेचून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र राकेश घटनास्थळी आढळून न आल्याने हत्येनंतर तो पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्याचाही शोध सुरू ठेवण्यात आला.
दरम्यान, त्याच दिवशी राकेशच्या शेतातच त्याचा मृतदेह आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर राकेशने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पेंढरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
या दाम्पत्याला मानवी , मेहमा, शालिनी या तीन मुली आणि अर्णव हा एक मुलगा आहे. आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने चारही चिमुकली मुले आणि त्यांचे वृद्ध आजोबा पोरके झाले असून या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण धानोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.




