Home विशेष भेंडाळा परिसरातील सुपीक शेतीजमीन एमआयडीसीला देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!

भेंडाळा परिसरातील सुपीक शेतीजमीन एमआयडीसीला देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!

0
197

 

शेतकऱ्यांच्या भूमीहक्काच्या लढ्यात काँग्रेसचा ठाम पाठिंबा — जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

“सुपीक जमीन उद्योगासाठी नव्हे, शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठीच असावी” — शेतकऱ्यांचा इशारा.

ग्रामसभांचे एकमताने ठराव; शेतकरी चळवळ तीव्र होण्याचे संकेत

गडचिरोली ::
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतीजमीन औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) अधिग्रहित करून त्या ठिकाणी JSW कंपनीचा स्टील प्रकल्प उभारण्याची प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली असून, या आंदोलनाला आता काँग्रेस पक्षानेही पाठिंबा जाहीर केला आहे.

भेंडाळा, फोकुर्डी, फराडा, मोहुर्ली, रामाळा, घारगाव, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगणापूर, कान्होली, कळमगाव, नवेगाव माल, चाकलपेठ आदी गावांतील ग्रामसभांनी एकमुखाने ठराव मंजूर करून जमीन अधिग्रहणास विरोध दर्शविला आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, चिचडोह व कन्नमवार जलाशयाच्या पाण्यामुळे या भागातील शेती ओलीताखाली येऊन बारमाही झाली आहे. त्यामुळे या परिसरातील शेती अत्यंत उत्पादनक्षम असून, येथे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अशा सुपीक जमिनी उद्योगासाठी घेणे म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करणे आणि त्यांच्या पोटावर लाथ मारण्यासारखे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर भेंडाळा परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व शेतकऱ्यांचे मोठे शिष्टमंडळ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “एमआयडीसीसाठी आमची जमीन आम्ही देणार नाही,” असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी यावेळी मांडला.

जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू. जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत हा प्रश्न शासनदरबारी जोरदारपणे मांडला जाईल.”

 

या वेळी उपसरपंच वेलतूर तुकूम दिगंबर धानोरकर, घारगाव सरपंच विवेक भगत, मोहरली सरपंच सुधीर शिवणकर, गंगाधर शेडमाके, भरत घेर, चरण पोर्टे, मनोज पोरटे, राजेश्वर चौधरी, तोताजी आभारे, सतीश पुटकमवार, नुमचंद भिवणकर, रोहिदास धोटे, रेवनाथ खेडेकर, संजय खेडेकर, रवींद्र वाडगुरे, नरेंद्र जीवारे, मनोज बारसागडे, आनंदराव सातपुते, नामदेव दिगंबर, गुरुदेव घोगरे, तुमदेव देहलकर यांच्यासह भेंडाळा परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पुढील काळातही आपल्या जमिनींच्या रक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून, या भागात शेतकरी चळवळ तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here