Home सामाजिक माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या...

माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी…

0
159

 

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरसकट आर्थिक मदतीची मागणी

 

गडचिरोली (प्रतिनिधी):

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या अवकाळी पावसाचा जोर सुरू असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. कापणीस तयार असलेली धान, सोयाबीन, तूर, मका, हरभरा आदी पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. शेतातील कडपी कुजली असून काही ठिकाणी साठवलेले धान देखील ओलाव्यामुळे खराब झाले आहे. या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. मंत्री बावनकुळे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ब्रम्हपुरी येथे डॉ. उसेंडी यांनी त्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती दिली.

डॉ. उसेंडी म्हणाले की,“अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला हंगाम पाण्याखाली गेला आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेली मेहनत वाया गेली आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. आर्थिक मदत ही न्याय्य आणि वेळेत मिळणे गरजेचे आहे.”

 

या भेटीवेळी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, अशोक भैय्या, गणेश तळवेकर, आणि रोहित बोमावार उपस्थित होते.

 

बावनकुळे यांचे आश्वासन — “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे”

 

महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, “आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे, कष्टकरी वर्गाचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि नुकसानग्रस्तांना मदत देण्यात कोणतीही अडचण येऊ देणार नाही.”

मंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश देत सांगितले की, तात्काळ सर्वेक्षण (पंचनामे) करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत आणि पीक नुकसानीची अचूक नोंद केली जावी. त्यांनी स्पष्ट केले की शासन प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देईल आणि मदतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

कष्टकरी बळीराजाच्या मदतीची अपेक्षा…

बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक सहाय्य मिळावे, तसेच नुकसानग्रस्त भागांना विशेष निधी द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

डॉ. उसेंडी यांनी पुढे सांगितले की,“बळीराजा संकटात असताना शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत पोहोचवणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मेहनतीचा घाम वाया जाऊ नये, हीच खरी मदत ठरेल.”

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here