गडचिरोली: जगातील सर्व सामान्य व्यक्ती परमेश्वरा नंतर जर कुणाला देव मानत असेल तर तो उपचार करणारा डॉक्टर असेल यात मुळीच शंका केली जात नाही पण गडचिरोली शहरातील महिला व बाळ रुग्णालयात दोन वर्षाच्या लहान मुलाच्या उपचारात मुद्दाम दुर्लक्ष केलेल्या एक डॉक्टर ला विभागीय चौकशी अंती दोषी ठरवण्यात आले असून अखेर तीन वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे मागील चार दिवसा पासून आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती घेतली असता कळले की 13 जुलै 2022 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील प्रधाने कुटुंबातील पार्थ प्रधाने नावाच्या दोन वर्षाच्या मुलाला अचानक ताप आल्यानंतर उपचाराकरिता रात्री 11 वाजता गडचिरोली शहरातील महिला व बाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पार्थ ला दाखल करते वेळी रात्र पाळीला डॉ. तारकेश्वर उईके यांची नाईट ड्यूटी होती,परंतु पार्थ चे प्राथमिक उपचार सुरू झाल्यानंतर, अचानक पहाटे तीन वाजता पार्थची प्रकृती गंभीर झाल्याचे दिसून येताच रुग्णालयातील कार्यरत नर्स ने डॉ. उईके यांच्या मोबाईल वर संपर्क केला असता डॉ.उईके यांनी आपली झोप पूर्ण करण्यासाठी आपले मोबाईल बंद करून आपल्या घरी निघून गेल्याचे माहित झाले होते.जवळ पास तीन चार तास डॉ. उईके यांच्याशी संपर्क न झाल्याने अखेर पार्थला कोणताही उपचार न मिळाल्याने पहाटेच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता.
या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय लोकांचे दडपण आल्यानंतर त्यावेळचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी लगेच चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करून डॉ. उईके यांची ताबडतोब बदली केली होती.त्या घटनेची तीन वर्षात झालेल्या चौकशीत पार्थच्या उपचारात निष्काळजी झाल्याचे दिसून आले होते.चौकशी समितीने आपला अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर केल्यानंतर उप संचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी 18 जुलै 2025 रोजी आपल्या अहवालात, 13 जुलै 2022 रोजी पार्थ प्रधाने याचा मृत्यू डॉ.तारकेश्वर उईके यांनी मुद्दाम निष्काळजी केल्यामुळे झालेला असल्याचे नमूद केले आहे.
या अहवालाची प्रत प्रधाने कुटुंबाला मिळताच पार्थ चे काका चंदू प्रधाने यांनी दिनांक 24/7/2025 रोजी गडचिरोली ठाण्यात तक्रार दाखल केली असून डॉ.तारकेश्वर उईके यांच्यावर, पार्थ च्या उपचारात मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप निष्पन्न झाल्याने भारतीय न्याय संहिता कलम 304 A अंतर्गत डॉ. उईके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य विभाग व पोलिस विभागाने कमालीची गुप्तता पाळली…
डॉ.तारकेश्वर उईके यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य विभागाने आपल्या विभागाची बदनामी होईल या भीतीने कोणतीही माहिती पत्रकारांना मिळू नये यासाठी कमालीची गुप्तता ठेवल्यामुळे आता आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर लोकांकडून शंका निर्माण केली जात असल्याचे दिसून आले होते.




