Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली नगरपरिषद पोटनिवडणूक रंगात; प्रभाग क्रमांक ९ मध्ये तिरंगी लढत निश्चित… भाजपच्या...

गडचिरोली नगरपरिषद पोटनिवडणूक रंगात; प्रभाग क्रमांक ९ मध्ये तिरंगी लढत निश्चित… भाजपच्या उमेदवाराला ईश्वरचिठ्ठी पावली…

0
481

गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील ओबीसी राखीव जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी एकूण तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रभागात तिरंगी लढत निश्चित झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची ही निवडणूक रंगणार असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अंकुश दिलीप नैताम (वय २९, रा. हनुमान वार्ड, गडचिरोली), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून विनोद रामकृष्ण भांडेकर (वय ३८, रा. आठवडी बाजार, हनुमान वार्ड, गडचिरोली) तर अपक्ष उमेदवार म्हणून सुनील भास्कर बावणे (वय ४५, रा. ढीवरमोहल्ला, गडचिरोली) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आता पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडेल. २ जूननंतर प्रचाराच्या रणधुमाळीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून उमेदवारांना जवळपास १५ ते १७ दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या प्रभागातून यापूर्वी भाजपचे मुक्तेश्वर काटवे निवडून आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठी चर्चा रंगली होती.

मुक्तेश्वर काटवे यांचे पुतणे समीर काटवे यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा शहरात सुरू होती. त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयात जाऊन शक्तीप्रदर्शनही केल्याचे पाहायला मिळाले. मात्र समीर काटवे यांचा ठेकेदारी व्यवसाय ऐनवेळी त्यांच्या उमेदवारीच्या आड आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ठेकेदारी व्यवसाय सुरू असतानाही ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याची चर्चा शहरात रंगली होती. या प्रकरणामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाच्या भूमिकेवरही काही स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

दरम्यान, भाजपमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अखेर ‘ईश्वर चिठ्ठी’च्या माध्यमातून उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. दोन नावांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्यानंतर अंकुश नैताम यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि त्यानंतर भाजपने त्यांना अधिकृत एबी फॉर्म प्रदान केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे तसेच नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुश नैताम यांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढत मानले जात असून पक्ष संघटनाही पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.उमेदवारी अर्ज भरतांना भाजपचे जिल्हा महामंत्री तसेच निवडणुकीचे रणनीती कार गोविंद सारडा, भाजपा शहर प्रमुख अनिल कुनघाडरकर, नगरपालिकेचे उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

दुसरीकडे काँग्रेसने विनोद भांडेकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत विनोद भांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्या वेळी मुक्तेश्वर काटवे विजयी झाले होते. मात्र यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीत असल्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

काँग्रेसमधील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जमिनीवर उतरून प्रचार करण्याच्या तयारीत असून भाजपच्या राजकीय रणनीतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेतृत्वालाही आपल्या उमेदवाराच्या विजयाबाबत विश्वास असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार सुनील बावणे हे देखील स्थानिक पातळीवर सक्रिय असल्यामुळे मतांचे समीकरण बदलू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक केवळ भाजप आणि काँग्रेसपुरती मर्यादित न राहता तिरंगी आणि चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

संपूर्ण गडचिरोली शहराचे लक्ष आता या पोटनिवडणुकीकडे लागले असून येत्या २१ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर विजयश्रीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here