Home भ्रष्टाचार गडचिरोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संताप उसळला…भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ‘डफरे बजाओ’ आंदोलन; कार्यकारी अभियंता...

गडचिरोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात संताप उसळला…भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ‘डफरे बजाओ’ आंदोलन; कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या निलंबनाची मागणी…

0
160

 

 

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 मधील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर “डफरे बजाओ” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची तसेच गडचिरोली जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

 

आंदोलनादरम्यान अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आरोप केला की, कोरची तालुक्यातील नाडेकल-बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला पुल वाहतूक सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

याशिवाय 2025-26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती आणि पुल दुरुस्तीच्या सुमारे 50 कोटी रुपयांच्या कामांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष काम न करता बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

 

कात्रटवार यांनी पुढे आरोप केला की, मागील तीन वर्षांत तब्बल 5 हजार निविदा नियमबाह्य पद्धतीने काढण्यात आल्या असून संबंधित कामे मजूर सहकारी संस्थांना कमिशनच्या आधारावर विकण्यात आली. त्यामुळे शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा”, “निकृष्ट कामांची चौकशी करा” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

नाडेकल येथील कोसळलेल्या पुल प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

 

यावेळी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी इशारा देत म्हटले की, “कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल.”

 

या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here