“जमीन गेली तर आम्ही जिवंतपणी मेल्यासारखे होऊ”; विमानतळ भू-अधिग्रहणाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप…
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमी अधिग्रहणाच्या वादाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, हिरापूरनंतर आता गुरुवडा गावातील ग्रामस्थांनीही जनगणना प्रक्रियेवर स्पष्ट बहिष्कार टाकला आहे. प्रशासनाकडून जनगणना करण्यासाठी गावात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शवत रिकाम्या हाताने परत पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे यांनी स्वतः गुरुवडा गावात जाऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जनगणना ही शासनाच्या विविध योजनांसाठी महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाची भूमिका स्पष्टपणे नाकारत जनगणना होऊ देणार नसल्याचा ठाम निर्णय कायम ठेवला.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, विमानतळासाठी सर्वेक्षण आणि भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली प्रशासन आणि पोलीस विभागाचा वापर करून जबरदस्तीने जमीन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. “आमच्या पोटापाण्याचा आधार असलेली शेती जमीन जर जबरदस्तीने हिरावून घेतली, तर आम्ही जिवंतपणी मेल्यासारखे होऊ. आमच्या अस्तित्वावरच संकट आले असताना अशा जनगणनेचा आम्हाला काय उपयोग?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.
गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ज्या लोकांचे भवितव्यच धोक्यात आले आहे, ज्यांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे, अशा लोकांची जनगणना करून शासन नेमके काय साध्य करू इच्छित आहे? त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती प्रशासनाला देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
दरम्यान, गुरुवडा गावात जनगणनेला विरोध झाल्यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. याआधी हिरापूर, राखी आणि शिरपूरचक गावांमध्येही ग्रामस्थांनी जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली होती. आता गुरुवडा गावानेही तीच भूमिका घेतल्याने विमानतळ प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात भूमी अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या फौजफाट्यासह सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी मोठ्या प्रमाणात अविश्वास आणि संताप निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठे आंदोलन करत सरकारला थेट इशारा दिला होता. “जबरदस्तीने जमीन घेण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली होती.
आता गुरुवडा गावानेही जनगणना प्रक्रियेला विरोध केल्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाची दिशा काय राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।




