गडचिरोली : कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून एका तरुणाने स्वतःच्या वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यात घडली आहे. रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरमोरी-पालोरा मार्गावर ही घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
देवाजी आडकू धकाते (वय ६५, रा. ताडूरवारनगर, आरमोरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा योगेश देवाजी धकाते (वय २५) याला अटक केली आहे.
कौटुंबिक वाद पोहचला जीव घेण्या पर्यंत…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवाजी धकाते यांचा पालोरा गावाजवळ वीटभट्टीचा व्यवसाय होता. त्यांना पाच मुली व एक मुलगा योगेश आहे. सर्व मुलींचे विवाह झाले असून, वर्षभरापूर्वी योगेशचेही लग्न झाले होते. योगेश हा आपल्या पत्नीसह आई-वडिलांसोबत राहत होता.
दरम्यान, देवाजी हे योगेशच्या पत्नीला वारंवार रागावत असत. गर्भवती असतानाही तिला काम करण्यास भाग पाडले जात असल्याने योगेशला याचा राग होता. या कारणावरून पिता-पुत्रांमध्ये सतत वाद होत होते. हाच वाद हळूहळू तीव्र रागात परिवर्तित झाला.
दबा धरून बसला होता आरोपी मुलगा…
घटनेच्या दिवशी सायंकाळी योगेश हा वडिलांपूर्वीच वीटभट्टीवरून निघून गेला आणि पालोरा गावाजवळील सुनसान ठिकाणी दबा धरून बसला. साडेसातच्या सुमारास देवाजी आपल्या मुलीशी मोबाईलवर बोलत त्या मार्गाने जात असताना योगेशने अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
या हल्ल्यात देवाजी गंभीर जखमी झाले. त्यांच्या किंकाळ्या मोबाईलवर दुसऱ्या बाजूला असलेल्या मुलीने ऐकल्या; मात्र अचानक संपर्क तुटल्याने तिला संशय आला. तिने तत्काळ शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
हत्येनंतर आरोपी योगेशने रक्ताने माखलेली कुऱ्हाड पाण्याने स्वच्छ केली आणि काहीच घडले नाही, अशा आविर्भावात घरी परतला. त्यानंतर तो आई, चुलत भाऊ आणि इतर नातेवाईकांसोबत वडिलांचा शोध घेण्यासाठीही निघाला.
काही वेळाने बोगद्याजवळ देवाजी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. सुरुवातीला वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान योगेशच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. अखेर त्याने वडिलांच्या खुनाची कबुली दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे.




