Home विशेष शिवणी येथे शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र; सुपीक जमीन अधिग्रहणाला ठाम विरोध, आंदोलनाचा इशारा…

शिवणी येथे शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र; सुपीक जमीन अधिग्रहणाला ठाम विरोध, आंदोलनाचा इशारा…

0
371

 

गडचिरोली,

गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींविरोधात आता आंदोलनाची धार तीव्र होत आहे. शासनाकडून जबरदस्तीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पूर्वी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी आणि जयरामपूर परिसरातील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यानंतर भेंडाळा परिसरातील सुमारे १४ गावांतील सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता पुन्हा चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ गावांमध्ये भूसंपादन होणार असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवणी येथे जमीन अधिग्रहणग्रस्त गावांतील शेतकऱ्यांचे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भूषविले.

अधिवेशनात विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सविस्तर चर्चेनंतर सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने “कोणत्याही परिस्थितीत सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित होऊ देणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला. तसेच, या विरोधासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, शासन कंपनीच्या कामासाठी “हिटलरशाही” पद्धतीने वागत जबरदस्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या परिसरातील सुमारे ७ ते ८ गावांतील नागरिक एकत्र येऊन उद्या गडचिरोली मुख्यालयावर पत्रकार परिषद घेणार असून, पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, या महत्त्वाच्या चर्चासत्रावेळी शिवणी गावचे सरपंच अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “आमच्या गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना सरपंच गैरहजर का?” असा सवाल उपस्थित करत संतप्त शेतकऱ्यांनी सरपंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही शेतकऱ्यांनी तर सरपंच हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नसून अन्याय करणाऱ्या प्रशासन आणि सरकारच्या बाजूने आहेत का, अशी शंका व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर टीका करत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेती वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर देश वाचेल,” असे सांगत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या अधिवेशनास विविध पदाधिकारी, जनप्रतिनिधी आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत घेतलेल्या ठरावामुळे येत्या काळात या प्रश्नावर मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here