Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली–चामोर्शी मार्गावर भीषण अपघात; स्कॉर्पिओ–ट्रॅव्हल्स धडकेत ५ ठार, ७ गंभीर – रुग्णवाहिका...

गडचिरोली–चामोर्शी मार्गावर भीषण अपघात; स्कॉर्पिओ–ट्रॅव्हल्स धडकेत ५ ठार, ७ गंभीर – रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने संताप…

0
2250

 

गडचिरोली, दि. २९ मार्च:

गडचिरोली–चामोर्शी मार्गावर रविवारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात लग्नसमारंभाहून परतणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाची प्रवासी ट्रॅव्हल्स बसशी समोरासमोर जोरदार धडक होऊन ५ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हा अपघात गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील कुरुड–कढोली गावादरम्यान नाल्याजवळील धोकादायक वळणावर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनात एकूण १६ प्रवासी होते. हे सर्वजण रामपूर येथून लग्नसोहळा आटोपून भाडबिडी मोकासा येथे परतत होते.

दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 क्रमांकाच्या प्रवासी ट्रॅव्हल्स बसशी स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढले. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या मते, घटनेनंतर रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागला. या विलंबामुळे काही गंभीर जखमींचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यानंतर जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच आणखी दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुमारे चार तासांनी स्थानिक आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे,जिल्हाधिकारी अभिशांत पंडा तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोकुळ यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन जखमी व मृतकांच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपचाराबाबत आवश्यक सूचना दिल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, स्कॉर्पिओ चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला असला तरी याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, अपघातातील ट्रॅव्हल्स बस सुरजागड परिसरातील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरली जात असल्याची चर्चा होती. मात्र Lloyds Metals and Energy Limited कंपनीने अधिकृत निवेदनाद्वारे संबंधित बसचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही व्यक्तींनी कंपनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही कंपनीकडून करण्यात आला आहे.

या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघाताचा पुढील तपास सुरू असून जबाबदाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here