
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहराचे दैवतस्थान मानल्या जाणाऱ्या सेमाना देवस्थान परिसरात गडचिरोली महिला काँग्रेसच्या वतीने आज उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून “स्वच्छता ही केवळ शासकीय जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे” असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या देवस्थान परिसरात महिलांनी स्वतः पुढाकार घेत साफसफाई केली. झाडलोट, कचरा संकलन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करून त्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. “जिथे स्वच्छता असते, तिथेच देवत्व नांदते” ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आजच्या घडीला अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव जाणवतो. यासाठी केवळ ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून न राहता प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय लावल्यास संपूर्ण गाव आणि शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनू शकते.
तसेच, प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेसाठी योगदान दिल्यास शासकीय यंत्रणांवरील ताण कमी होईल आणि त्या अधिक प्रभावीपणे नियोजनबद्ध काम करू शकतील, असा आशावादही व्यक्त करण्यात आला. स्वच्छतेमुळे केवळ सौंदर्य वाढत नाही, तर अनेक आजारांपासूनही संरक्षण मिळते, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
या स्वच्छता अभियानात महिला काँग्रेसच्या सहसचिव सौ. कविता उराडे, कल्पनाताई नंदेश्वर, तालुकाध्यक्ष शालिनी पेंदाम, रिता गोवर्धन, मंजू आत्राम, सपना मांदळे, पोर्णिमाताई भडके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
महिला काँग्रेसच्या या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



