गडचिरोली : शाळेत निर्धारित वेळेत न पोहोचल्याच्या कारणावरून लहान वयाच्या विद्यार्थ्यांना उन्हात ताटकळत उभे ठेवून शिक्षा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला आहे. हा प्रकार आरमोरी रोडवरील प्लॅटिनम जुबली हायस्कूलमध्ये घडल्याचा आरोप काही पालकांनी केला असून या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी शाळेत ठरलेल्या वेळेनंतर पोहोचल्यामुळे त्यांना शाळेच्या गेटबाहेर उन्हात बराच वेळ उभे ठेवण्यात आले. संबंधित विद्यार्थी लहान वयाचे असल्याने अशा प्रकारे उन्हात ताटकळत उभे ठेवणे धोकादायक ठरू शकते, असे पालकांचे म्हणणे आहे. वेळेवर न आल्याबद्दल केवळ ताकीद देऊन विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात प्रवेश देणे अपेक्षित असताना त्यांना उन्हात उभे ठेवण्यात आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पालकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, जर त्या वेळी एखाद्या विद्यार्थ्याला उष्माघात झाला असता, चक्कर आली असती किंवा प्रकृती बिघडली असती, तर त्याला जबाबदार कोण राहिले असते? लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित इतक्या गंभीर बाबीकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांनी अशी कोणतीही घटना शाळेत घडलेली नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. मात्र संबंधित पालकांकडे विद्यार्थ्यांना उन्हात उभे ठेवण्यात आल्याचे फोटो असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा प्रशासन स्वतःची चूक लपवण्यासाठी घटना नाकारत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या प्रकारामुळे शाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेच्या संरक्षण भिंतीबाहेर उभे ठेवण्यात आल्यामुळे त्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशीही भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय, शाळेत येणाऱ्या स्कूल बस व ऑटो-रिक्शा चालकांना विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला उतरवण्यास भाग पाडले जाते, असा आरोपही करण्यात आला आहे. शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या आत मोठी मोकळी जागा उपलब्ध असतानाही वाहनांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात सुरक्षितपणे उतरवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
गडचिरोली शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण या शाळेत होत असल्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. शाळेच्या कार्यप्रणालीची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित शाळा संचालक व मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
आता या प्रकरणात शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि शाळेवर कोणती कारवाई होते, याकडे शहरातील पालकांचे लक्ष लागले आहे.




