Home ब्रेकिंग न्यूज वंशिका मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा : ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड? डॉक्टरांऐवजी अटेंडंटने लावला...

वंशिका मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा : ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड? डॉक्टरांऐवजी अटेंडंटने लावला होता ऑक्सिजन; सीसीटीव्ही तपासाची कुटुंबीयांची मागणी.

0
791

गडचिरोली :
गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात ५ मार्च रोजी ११ वर्षीय वंशिका या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता एक धक्कादायक नवीन खुलासा समोर आला आहे. वंशिकाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की ज्या बेडवर वंशिकाला भरती करण्यात आले होते, त्या बेडवरील ऑक्सिजन यंत्रणेमध्ये बिघाड होता. तसेच डॉक्टरांनी ऑक्सिजन लावण्याऐवजी अटेंडंटकडून ऑक्सिजन लावण्यात आल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वंशिकाची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर तिला तात्काळ ऑक्सिजन देणे गरजेचे होते. मात्र त्या वेळी डॉक्टरांकडून योग्य ती कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अटेंडंट वैभव लडके यानेच वंशिकाला ऑक्सिजन लावल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात विचारणा केली असता वैभव लडके याने सांगितले की सेकंड इंचार्ज सिस्टरने त्याला वंशिकाला ऑक्सिजन लावण्यास सांगितले होते. मात्र ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया ही तांत्रिक असून त्यामध्ये ऑक्सिजनचा दाब आणि प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक असते. अटेंडंटला त्याबाबत पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित झाला नसावा, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी ऑक्सिजन पाइपमधून पुरवठा बंद झाला होता किंवा ऑक्सिजनचा दाब कमी-जास्त होत होता. त्यामुळे वंशिकाची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या शरीरात झटके येऊ लागल्याचेही सांगण्यात आले.
या घटनेच्या वेळी रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डॉ. तारकेश्वर उईके हे कार्यरत होते. मात्र त्यांनी सुद्धा त्यावेळी वंशिकेच्या गंभीर प्रकृतीकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. योग्य वेळी डॉक्टरांनी लक्ष दिले असते आणि तांत्रिक पद्धतीने उपचार केले असते तर वंशिकेचा जीव वाचू शकला असता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या नव्या खुलाशानंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित दोषींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात बालरोग तज्ज्ञ डॉ. तारकेश्वर उईके तसेच अटेंडंट वैभव लडके यांना आरोपी म्हणून समाविष्ट करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
तसेच या घटनेच्या वेळी रुग्णालयात नेमके काय घडले याचा सखोल तपास रुग्णालयात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजद्वारे करण्यात यावा आणि त्या फुटेजमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंशिकाच्या लेनगुरे कुटुंबीयांनी केली आहे.
वंशिकाच्या कुटुंबीयांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात त्यांना रुग्णालय प्रशासनावर कोणताही विश्वास राहिलेला नाही. या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची अपेक्षा आता फक्त पोलीस यंत्रणेवरच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीरपणे व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित व्यक्तींचे बयान नोंदवून पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

महिला व बाल रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here