गडचिरोली :
येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचारादरम्यान ११ महिन्यांच्या वंशिका साजन लेनगुरे या बालिकेचा झालेला मृत्यू गंभीर मानत जिल्हा शल्यचिकित्सकांनी सहा तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष चौकशी समिती गठीत केली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, समितीच्या अहवालाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
माहितीनुसार, गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील वंशिका साजन लेनगुरे हिला ताप आल्यामुळे कुटुंबीयांनी ४ मार्च रोजी गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच ५ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. वंशिकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप केला. या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वंशिकाचे वडील साजन लेनगुरे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची विनंती केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी तातडीने दखल घेत शुक्रवारी सहा तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले. या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. प्रमोद बन्सोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. ललित मेश्राम, डॉ. शशिकांत ढोबले, डॉ. इंद्रजीत नागदेवते, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. मुकुंद ढबाले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
ही समिती वंशिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, उपचारादरम्यान वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन झाले होते का, तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला का, याची सखोल तपासणी करणार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गडचिरोली विधानसभा क्षेत्राला डॉक्टर असलेले आमदार लाभलेले असतानाही आरोग्य व्यवस्थेमध्ये अपेक्षित सुधारणा का होत नाहीत, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
समितीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असल्याने मृत बालिकेच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गडचिरोलीकरांचे लक्ष आता या चौकशी अहवालाकडे लागले आहे.




