महिला आयोग आपल्या दारी’ कार्यक्रमात महिलांच्या तक्रारींची सुनावणी…
गडचिरोली : राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम दि. 20 फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील समस्याग्रस्त शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी आणि अडीअडचणी मांडल्या.
या कार्यक्रमास गडचिरोली शहराच्या प्रथम नागरिक तथा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ad. प्रोणिता निंबोरकर या विशेष उपस्थित होत्या. कार्यक्रमस्थळी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आगमनावेळी नगराध्यक्षा निंबोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या तक्रारींची सुनावणी सुरू असताना नगराध्यक्षा प्रोणिता निंबोरकर यांनीही पुढाकार घेत गडचिरोली नगरपालिकेच्या आवारात स्वतंत्र महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याकडे केली. महिलांच्या समस्या स्थानिक पातळीवर तत्काळ सोडविण्यासाठी असे केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
नगराध्यक्षा निंबोरकर यांनी महिलांच्या प्रश्नांबाबत दाखविलेला उत्साह आणि सकारात्मक भूमिका लक्षात घेऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कार्यक्रमादरम्यानच त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. तसेच गडचिरोली शहराच्या प्रथम नागरिक म्हणून शहरातील महिलांच्या समस्या, अडीअडचणी तसेच शासनाच्या विविध योजनांमधील लाभार्थी महिलांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना आपले प्रश्न थेट महिला आयोगासमोर मांडण्याची संधी मिळाली. तसेच महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या न्यायहक्कांच्या संरक्षणासाठी प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमामुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




