गडचिरोली | दि. १९ फेब्रुवारी २०२६
शहरातील टायगर ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याला नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी आज सदिच्छा भेट देत उपस्थित शिवछत्रप्रेमींचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
टायगर ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. “जय शिवराय”च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. या कार्यक्रमाला शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निबोंरकर यांनी समस्त शिवछत्रप्रेमी नागरिकांना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, शौर्य आणि लोककल्याणकारी दृष्टीकोन आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आदर्शांवर चालत समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी शिवरायांना अभिवादन ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्षांच्या या भेटीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले असून उपस्थित शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला असून, उपस्थितांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज आणि राष्ट्रसेवेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते.




