Home भ्रष्टाचार ४२ टक्के कमी दराने ठेका घेऊन निकृष्ट काम; गडचिरोली नगरपालिकेतील रस्ते कामात...

४२ टक्के कमी दराने ठेका घेऊन निकृष्ट काम; गडचिरोली नगरपालिकेतील रस्ते कामात भ्रष्टाचाराचा प्रयत्न उघड… नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांची तातडीची दखल; ठेकेदाराला तंबी…

0
976

 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली नगरपालिकेच्या हद्दीत ४२ टक्के कमी दराने रस्त्याच्या कामाचा ठेका घेऊन अंदाजपत्रकानुसार काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न एका ठेकेदाराने केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कमी दरात ठेका मिळवून त्यामध्ये ‘गोड बंगाल’ करून जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने कामात तडजोड केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सदर ठेकेदार रस्त्याचे काम अंदाजपत्रकात नमूद केलेल्या परिमाणानुसार तसेच अटी-शर्तीनुसार न करता काम करत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी काही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची सत्यता स्पष्ट झाली. याबाबतची तक्रार तातडीने नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर यांच्याकडे करण्यात आली.

तक्रारीची दखल घेत नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी कोणताही विलंब न करता स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान कामात गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलीच तंबी देत अंदाजपत्रकानुसार आणि नियमानुसारच काम करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

नगराध्यक्षा यांनी यावेळी ठाम शब्दांत इशारा देताना सांगितले की, “अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम झाले नाही, तर संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले जाणार नाही. तसेच गरज पडल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

या कामाचा ठेकेदार समीर काटवे असून, तो आपल्या एका नातेवाईक असलेल्या नगरसेवकाच्या पाठबळावर या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. कमी दराने ठेका मिळवून इतर ठेकेदारांशी स्पर्धा करण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्यामुळे गडचिरोली नगरपालिकेत गुणवत्ता नसलेल्या कामांचा सपाटा सुरू झाला आहे का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठेकेदार आपल्या नातेवाईकाच्या भरोशावर मनमानी करत असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांनी कोणताही भेदभाव न करता तातडीने कारवाई करत ठेकेदाराला बोलावून स्पष्ट सूचना दिल्या. नियमानुसार व दर्जेदार काम न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणामुळे गडचिरोली शहरातील विकासकामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यापुढे अशा प्रकारांवर कितपत कठोर भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here