Home ब्रेकिंग न्यूज शासकीय दुःखवट्यात सुद्धा नगर परिषदेत पदग्रहण सोहळा…‘हे सत्ताधाऱ्यांना शोभणारे नाही’ – नगरसेवक...

शासकीय दुःखवट्यात सुद्धा नगर परिषदेत पदग्रहण सोहळा…‘हे सत्ताधाऱ्यांना शोभणारे नाही’ – नगरसेवक बाळू टेंभुर्णेंचा संताप…

0
914

 

नगरसेवक बाळू टेंभुर्णेंचा सभापती अनिल कुनघाडकर यांच्या कॅबिनमध्ये जाऊन केला निषेध…

गडचिरोली | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दु:खद निधन झाल्याने राज्य शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही गडचिरोली नगर परिषदेत आज बांधकाम सभापती पदाचा पदग्रहण सोहळा पार पडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी शासकीय दुःखवट्याच्या दिवशीच पदग्रहण केल्याने ही बाब सत्ताधारी महायुतीतील पदाधिकाऱ्यांना शोभणारी नसल्याचा आरोप करत नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी थेट सभापतींच्या कॅबिनमध्ये जाऊन सर्वांसमक्ष जाहीर निषेध नोंदवला.

विशेष म्हणजे, आज नगर परिषद सभागृहात एकीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम, तर दुसरीकडे बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांची कोणतीही पूर्वकल्पना नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांना देण्यात आली नव्हती.

काही कामानिमित्त नगर परिषदेत आले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सभापतींच्या कॅबिनमध्ये जाऊन सभापती तसेच सत्ताधारी पक्षाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

निषेध करताना टेंभुर्णे म्हणाले की,“राज्यात शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला असताना पदग्रहणासारखे कार्यक्रम कसे काय आयोजित केले जातात? हे अत्यंत दुर्दैवी व सत्ताधाऱ्यांना अशोभणारे कृत्य आहे. अशा परिस्थितीत असे कार्यक्रम घेणे योग्य नाही.”

या घटनेवेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच काँग्रेसचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष उपस्थित होते.

दरम्यान, बांधकाम सभापतींनी नैतिकतेचा विचार करून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणीही नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here