Home भ्रष्टाचार विकास कामात भ्रष्टाचार सहन करणार नाही…काँग्रेस नगरसेवकांकडून निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे...

विकास कामात भ्रष्टाचार सहन करणार नाही…काँग्रेस नगरसेवकांकडून निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम उघड; ठेकेदारावर कारवाईचे आदेश…

0
701

 

गडचिरोली | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ७ मधील महिला रुग्णालयाच्या मागील भागात सुरू असलेल्या नवीन सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे नियमानुसार खोदकाम न करता, तसेच जुन्या डांबरी रस्त्यावरील माती व कचरा साफ न करताच थेट सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू केल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बाबीची माहिती मिळताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे काम स्पष्टपणे समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ काम थांबवण्याचे आदेश देत नियमानुसार खोदकाम करूनच रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.

या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत मोटघरे, नगरसेवक नंदुभाऊ कायरकर, मेघा मोहन वरघन्टीवार, नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी शब्बीर शेख तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठेकेदाराला अंदाजपत्रकानुसार काम का केले जात नाही, असा जाब विचारण्यात आला असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

दरम्यान, विकास कामांमध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल आणि सत्ताधारी वर्गाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर असा भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला. विरोधी पक्षाचे नगरसेवक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याने, आता सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी पार पाडण्याचा दबाव निर्माण झाला असून, भविष्यात विकासकामे पारदर्शक व दर्जेदार होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here