Home ब्रेकिंग न्यूज भाजप च्या कोर कमिटीत तुफानी तांडव… बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा, पदाधिकाऱ्यावर धावून...

भाजप च्या कोर कमिटीत तुफानी तांडव… बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा, पदाधिकाऱ्यावर धावून जात हात उगारल्याचा आरोप…??

0
2776

गडचिरोलीत भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला;

गडचिरोली :
नगर परिषद निवडणूक आणि त्यानंतर उद्भवलेल्या सत्तासमीकरणांमुळे भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आमदार आणि निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्वाच्या संघर्षाला गंभीर वळण मिळाले. बैठकीदरम्यान आमदारांनी विनाकारण वाद घालत संबंधित पदाधिकाऱ्यावर धावून जाऊन हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत असून, काही काळ संपूर्ण वातावरण तणावपूर्ण बनले होते.
नगर परिषद निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू असताना आमदारांनी निर्णय प्रक्रियेत आपल्याला विश्वासात न घेता डावलले जात असल्याची तक्रार मांडली. यावर संबंधित पदाधिकाऱ्याने आपल्याला देण्यात आलेल्या अधिकारांनुसारच निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र यावेळी आमदार अधिकच आक्रमक झाले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी थेट त्या पदाधिकाऱ्यावर धाव घेत हात उगारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून बैठकीत उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी हादरले.
अनेक नाराज पदाधिकाऱ्यांचा आमदारांवर जोरदार हल्लाबोल
या घटनेनंतर संबंधित पदाधिकाऱ्याने आमदारांवर तीव्र शब्दांत टीका केली.
“आमदारांनी आधी आपली आमदारकी पाहावी. विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे. पक्षाच्या संघटनात्मक कामात ढवळाढवळ करू नये. ज्यांनी त्यांना निवडून आणले, त्या कार्यकर्त्यांना राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
नगर परिषद निवडणुकीतील अपयशासाठीही आमदारांनाच जबाबदार धरत ते म्हणाले,
“आमदारांच्या हट्ट आणि जिद्दीमुळे चुकीचे उमेदवार देण्यात आले. परिणामी जवळपास पाच उमेदवारांचा पराभव झाला आणि भाजपला केवळ निसटते विजय मिळाले.”
इतकेच नव्हे, तर “जिल्हा भाजपची संपूर्ण कार्यकारिणी आमदारांच्या खासगी कार्यालयातूनच चालते, असा गैरसमज आमदारांचा झाला आहे. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर लोकांच्या प्रत्यक्ष समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. स्थानिक प्रश्न थेट विधानभवनात मांडून लोकांची दिशाभूल करणे आणि भूलथापा देणे थांबवावे,” असे गंभीर आरोपही त्यांनी केले.
नगरपालिका सत्तास्थापनेवरून संघर्ष तीव्र
या अंतर्गत संघर्षामागे नगर पालिकेतील सत्तास्थापनेचे राजकारण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आमदारांच्या मर्जीतले काही उमेदवार निवडून न आल्याने तसेच त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून झाल्यामुळे, आमदारांनी नगर पालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी न करण्याची जिद्द धरल्याची चर्चा आहे.
महायुतीचे नेते बंटी भांगडिया यांनी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व महायुतीच्या उमेदवारांना घेऊन सत्ता स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या घोषणेलाही आमदारांनी विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आमदारांचा हा विरोध म्हणजे पक्षाच्या अधिकृत भूमिकेलाच आव्हान आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी
वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघांनाही वेगळे केले. अखेर संबंधित पदाधिकाऱ्याला बैठक सोडून घरी जाण्याची सूचना करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पहिल्यांदाच असा गंभीर प्रकार घडल्याने पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

नागपूर येथे तातडीची बैठक; कार्यकर्त्यांसह आमदारांचा ठिय्या?
या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी व संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी आज नागपूर येथे कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावल्याची माहिती आहे.
दरम्यान, आमदारांनी आपली बाजू मजबूत करण्यासाठी आणि “कातडी वाचवण्यासाठी” युवा मोर्चाचे ७०–८० कार्यकर्ते घेऊन नागपूरला ठाण मांडल्याचा दावा नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाजप नेत्याने केला आहे.

तीन वेगवेगळ्या प्रतिक्रिया
१) जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांची प्रतिक्रिया
या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले,
“काल नगरपालिकेच्या सभापती नियुक्तीच्या नियोजनासाठी कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मी स्वतः त्या बैठकीत उपस्थित होतो. कोणत्याही आमदार व पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले नाहीत. कोणावरही हात उगारण्याचा किंवा मारहाणीचा प्रकार घडलेला नाही. ही केवळ अफवा आहे.”
२) प्रभारी संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांची प्रतिक्रिया
डॉ. उपेंद्र कोठेकर यांनीही सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले,
“अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या नियोजनासाठी कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. मारहाण किंवा गैरवर्तनाचा प्रश्नच येत नाही. काही जण अपवादात्मक पद्धतीने या गोष्टी वाढवून सांगत आहेत.”
३) जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची प्रतिक्रिया
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडत सांगितले,
“बैठकीदरम्यान काही मतभेद झाल्यामुळे विवादास्पद परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मला मिळाली आहे. मात्र पक्षाची संघटनात्मक मजबुती वाढविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. अशा प्रकारचे मतभेद पुन्हा निर्माण होणार नाहीत, याची दक्षता जिल्हा संघटन घेईल.”

भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता थेट नगरपालिकेच्या सत्तासमीकरणांवर परिणाम करणारा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्व नेमकी कोणती भूमिका घेते आणि या वाढत्या वादावर कसा तोडगा काढते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here