Home गडचिरोली गडचिरोली शहरात वेगमर्यादा कधी लागू होणार? भरधाव अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला...

गडचिरोली शहरात वेगमर्यादा कधी लागू होणार? भरधाव अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका; प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप…

0
256

 

गडचिरोली : शहरातून दिवस-रात्र भरधाव वेगाने धावणारी अवजड वाहने, टिप्पर, भरलेली मालवाहतूक वाहने आणि रेती डुलाई करणारी वाहने यामुळे गडचिरोली शहर अक्षरशः मृत्यूच्या सावटाखाली आले आहे. आधीच अनेक भीषण अपघात घडून निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असताना, आजतागायत शहरात वेगमर्यादेची ठोस नियमावली लागू न होणे ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे मत आता नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये तसेच अंतर्गत वस्तीमधून जाणाऱ्या महामार्गांवर अवजड वाहने भरधाव वेगाने जात आहेत. विशेष म्हणजे गिट्टी भरून नेणाऱ्या टिप्परमधून दगड रस्त्यावर पडण्याच्या घटना वारंवार घडत असून, त्यामुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वाहतूक नियंत्रणाबाबत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कॉम्प्लेक्स परिसर, मुख्य न्यायालय, गोंडवाना विद्यापीठ, एमआयडीसी, आरटीओ कार्यालय अशा अतिसंवेदनशील भागांतूनसुद्धा वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे विदारक चित्र रोज पाहायला मिळत आहे. यामुळे लहान वाहनधारक, पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये कायम भीतीचे वातावरण आहे. शहरातील चारही महामार्गांवर शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांना सायकल किंवा दुचाकीने प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

“लोकांचे जीवन स्वस्त झाले आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भर चौकात वेगमर्यादा तोडणाऱ्या वाहनांचा पाठलाग केल्यास वाहनचालक अधिक वेगाने पळ काढून पुन्हा अपघात घडवू शकतो, अशी भीती खुद्द वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाही वाटत असल्याची चर्चा आहे.

नागरिकांनी शहरात वाहनांच्या श्रेणीनुसार वेगमर्यादा तातडीने लागू करावी, वेगमर्यादा मोडणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ई-चलनाची कठोर कारवाई सुरू करावी, अशी ठाम मागणी केली आहे. यासोबतच सायलेन्सरमधून फटाके फोडणाऱ्या दुचाकी, कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या चारचाकी, काळी फिल्म लावलेली वाहने व फॅन्सी नंबर प्लेट्स यांच्यावरही तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महामार्गांवर कायमस्वरूपी काँक्रीट स्पीड ब्रेकर शक्य नसले तरी तात्पुरत्या उपाययोजनांअंतर्गत रबरी अथवा फायबरचे पिवळे- काळे स्पीड ब्रेकर चारही महामार्गांवर व अंतर्गत वस्तीला जोडणाऱ्या मोडींवर बसवावेत, अशीही मागणी जोर धरत आहे. यासाठी नगरपालिका, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी परस्पर समन्वय साधून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक आमदारांनी दुर्लक्ष केल्याचीही तीव्र टीका होत आहे. आमदारांनी विधानसभेत फक्त अवजड वाहनांची वेळ रात्रपाळीत करण्याची मागणी केली; मात्र स्थानिक पातळीवर प्रशासनाशी समन्वय साधून ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने युवक संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

उच्चशिक्षित, युवावर्गातील आमदार असूनही आरोग्य, वाहतूक, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने “गडचिरोलीकरांच्या समस्या रामभरोसेच राहणार का?” असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे. शहरातील वाढते अपघात थांबवण्यासाठी वेगमर्यादा आणि कठोर अंमलबजावणी ही आता काळाची गरज बनली असून, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here