Home ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा जाहीर अपमान; कर्मचारी संघटनेचा तीव्र निषेध, आंदोलनाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा जाहीर अपमान; कर्मचारी संघटनेचा तीव्र निषेध, आंदोलनाचा इशारा

0
1319

 

गडचिरोली, दि. 27 डिसेंबर :

गोंडवाना विद्यापीठ व लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक–खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर सुरू करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा जाहीर अपमान झाल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठातील वातावरण तापले असून, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दि. 27 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाचा भव्य समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी व माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मात्र, अत्यंत खेदजनक बाब म्हणजे शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही विद्यापीठ प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सक्तीने कार्यालय खुले ठेवण्याचे व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले. आदेशानुसार कर्मचारी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले असता, त्यांच्यासाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, संवैधानिक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, पत्रकार व विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध असताना, विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, अनेक कर्मचाऱ्यांना कार्यक्रमस्थळावरून अपमानास्पद पद्धतीने परत जावे लागले. इतकेच नव्हे तर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे अधिसभा सदस्य व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासाठीही स्वतंत्र जागा राखीव नसल्याने त्यांनाही उठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

कर्मचारी हे विद्यापीठाचे आधारस्तंभ असून, त्यांच्या शिवाय कोणतेही प्रशासकीय कामकाज शक्य नाही. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांशी करण्यात आलेली हीन वागणूक अत्यंत निषेधार्ह असल्याचे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून पदोपदी कर्मचाऱ्यांना कमी लेखले जात असून, त्यांच्या न्याय्य मागण्या व प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. हा अन्यायकारक व अपमानास्पद दृष्टिकोन आता सहन केला जाणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना ही नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आली असून, सदर घटनेतील अपमान संघटना कदापिही सहन करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवित, विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागावी व भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याची ठोस हमी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही संघटनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here