गडचिरोली, दि. २६ :
नायलॉन मांजामुळे होणारे प्राणघातक अपघात, दुचाकीस्वारांचे मृत्यू तसेच पक्ष्यांच्या जीविताला निर्माण होणारा गंभीर धोका लक्षात घेता मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांवर कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
प्रस्तावित दंडात्मक तरतुदी….
उच्च न्यायालयाने नायलॉन मांजासंदर्भात खालीलप्रमाणे दंड आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे—
अल्पवयीन प्रकरणांत पालकांवर दंड…
एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, संबंधित पालकांवर ५० हजार रुपयांचा दंड का आकारू नये, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.
प्रौढ व्यक्तींवर थेट कारवाई…
कोणतीही प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास, त्याच्यावर ५० हजार रुपयांचा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो.
विक्रेत्यांवर कठोर दंड…
नायलॉन मांजाचा साठा बाळगणे अथवा त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रत्येक उल्लंघनासाठी २ लाख ५० हजार रुपयांचा मोठा दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे.
नागरिकांना म्हणणे मांडण्याची संधी…
नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार, ही कारवाई अंतिम करण्यापूर्वी नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध ज्यांना आक्षेप अथवा निवेदन सादर करायचे आहे, त्यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर सुनावणीस कोणीही उपस्थित न राहिल्यास, या दंडात्मक कारवाईस जनतेचा कोणताही आक्षेप नाही, असे गृहीत धरले जाईल.
प्रशासनाचा स्पष्ट इशारा…
नायलॉन मांजावर आधीपासूनच बंदी असतानाही त्याचा वापर किंवा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर व आर्थिक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.




