गडचिरोली, दि. १० डिसेंबर २०२५
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाला हादरवून टाकणाऱ्या धक्कादायक प्रकरणानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीची आणि कडक कारवाई केली आहे. कंत्राटी परिचारिकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच तिने केलेल्या शारीरिक शोषणाच्या गंभीर आरोपांच्या आधारावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
पीडित परिचारिकेने तक्रारीत नमूद केले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी तिची वेतनवाढ रोखून ठेवत शारीरिक संबंधांची मागणी केली. या सातत्यपूर्ण मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा मामला समोर आल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोग्य प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
निलंबनाची कारणे आणि शासनाचा निर्णय…
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार परिचारिकेच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करता यावी म्हणून विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबन काळातील नवीन मुख्यालय…
निलंबन कालावधीत डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना नियमित कामकाजापासून दूर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे अधिकृत विधान…
जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी निलंबन आदेश जाहीर करताना म्हटले की “परिचारिकेने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्याची सत्यता तपासण्यासाठी विभागीय चौकशी अपरिहार्य आहे. चौकशीची प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडावी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन आवश्यक होते.”




