अतिक्रमण, वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या गोंधळामुळे नागरिकांचा संताप उसळला…
गडचिरोली, दि. 10 :
शहरातील चंद्रपूर मार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात कारमेल स्कूलमधील शिक्षिका ममता बांबोळे (वय अंदाजे 45) यांचा जागीच मृत्यू झाला. बी फॅशन मॉल समोर एक मालवाहू ट्रक रिव्हर्स घेत असताना त्यांच्या दुचाकीचा तोल सुटला आणि त्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या. प्रचंड रक्तस्राव व गंभीर स्वरूपाच्या दुखापतीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अतिक्रमणाचा रस्ता ‘गिळला’; पार्किंगचा प्रश्न टोकाला…
चंद्रपूर मार्ग हा शहरातील सर्वाधिक गर्दीचा मार्ग. मात्र या रस्त्यावर अतिक्रमण आणि अव्यवस्थित पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अनेक दुकानांनी रस्ताच व्यापल्याचे चित्र सर्वत्र दिसते. दुकानासमोर पार्किंग नसल्याने वाहनधारक गाड्या थेट रस्त्यात उभ्या करतात. काही दुकानदार तर आपले सामानही रस्त्यावरच ठेवतात, त्यामुळे रस्ता अरुंद होत असून मोठ्या वाहनांना वळसा घेणे अशक्यप्राय बनले आहे. परिणामी वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका सुरुच आहे.आजचा अपघातही अशाच परिस्थितीत घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
“जागा खूप कमी होती… ट्रक रिव्हर्स घेत होता… मॅडमनी गाडीचा ब्रेक मारल्यावर स्कूटी स्लिप झाली आणि त्या खाली कोसळल्या,” अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शींनी दिली.
परिसरात तणाव, नागरिकांचा संताप…
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.
“रोज हा मार्ग धोकादायक बनतोय… अतिक्रमणावर कारवाई नाही, पार्किंग नाही, पोलिस नाहीत… प्रशासन फक्त घटना घडल्यावर जागं होतं,” असे स्थानिकांनी आरोप केले आहे.
संबंधित मालवाहू ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रशासनावर तातडीने दबाव वाढला…
या अपघातानंतर अतिक्रमणावर कारवाई, वाहतूक नियंत्रण व्यवस्था मजबूत करणे, तसेच मुख्य मार्गावर शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पोलिस व स्थानिक प्रशासनाने वेगमर्यादा नियंत्रण, वाहतूक नियमांचे पालन आणि अतिक्रमण हटवण्याबाबत तातडीचे पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाचा प्रश्न : आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?
दररोज वाढणारी वाहतूक, वाढते अतिक्रमण, रस्त्यावरील गोंधळ आणि बेजबाबदार पार्किंग – या सर्वांचा बळी आज एक शिक्षिका झाली. हा अपघात केवळ एक घटना नसून शहरातील गंभीर व्यवस्थापकीय त्रुटींचा परिणाम असल्याचे स्पष्ट दिसते. नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिली.
आता तरी प्रशासन जागे होऊन ठोस पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




