सेवानिवृत्त शिक्षक रमेश रामटेके यांचे शिक्षण विभागावर धरणे आंदोलन.
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारी माहिती आज समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध विद्याभारती हायस्कूल मध्ये आदिवासी जातीसाठी राखीव असलेल्या शिक्षक पदावर संस्थेच्या मालकाने स्वतःच्या पत्नीची नियुक्ती केल्याचा धक्कादायक आरोप सेवानिवृत्त शिक्षक रमेश दिनाजी रामटेके यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्वर्गीय गोविंदराव मुनघाटे यांनी स्थापन केलेल्या या शाळेत त्यांच्या सुपुत्र राजाभाऊ गोविंदराव मुनघाटे यांनी आदिवासी उमेदवार उपलब्ध असतानाही OBC जातीच्या स्वतःच्या पत्नीची नियुक्ती केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नियुक्तीसाठी मागणी BA-B.Ed पात्रतेची; तरीही B.Com-B.Ed उमेदवाराची निवड?
रामटेके यांनी सांगितले की, या पदासाठी बीए-बीएड अशी पात्रता अनिवार्य होती. मात्र, सरकारी निकषांना विरोध करीत वंदना (कुबडे) राजू मुनघाटे यांची B.Com-B.Ed ही अपात्र पात्रता दाखवून नियुक्ती करण्यात आली.यानंतर त्यांना बेकायदेशीर पदोन्नती देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.
तसेच B.Com आणि Economics मधील M.A.!— ही पात्रता माध्यमिक शिक्षणाच्या शिक्षक निकषात बसत नसल्याचे तांत्रिक स्पष्टीकरणही रामटेके यांनी दिले.

“आदिवासी उमेदवाराचा हक्क बळकावला” — तक्रारदार रामटेके.
रामटेके यांनी दोन वर्षांपासून शिक्षण विभागाकडे सतत तक्रारी केल्या होत्या परंतु, संस्थाचालकांच्या राजकीय प्रभावामुळे शिक्षण विभाग मौन बाळगून बसला, असा आरोप त्यांनी केला.
शिक्षण अधिकारी दादाजी भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की “ही नियुक्ती माझ्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मंजूर केली होती. संपूर्ण माहिती वरिष्ठांकडे पाठवली आहे.त्या तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली असून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
कारवाई न झाल्याने शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन…
कारवाई न झाल्यामुळे आजपासूनच शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.हे आंदोलन अहिंसक मार्गानेच होणार असल्याची माहिती रामटेके यांनी प्रशासनाला दिली.
जिल्ह्यात हलचल; शिक्षण विभागाची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात…
आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी उमेदवाराचा हक्क हिरावून घेतल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षण विभागाने दोन वर्षे तक्रार दाबून ठेवली, यामुळे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विधानसभेत मुद्दा गाजण्याची शक्यता…
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले असताना ही बाब मोठा राजकीय मुद्दा बनू शकते.या प्रकरणाची दखल घेऊन विरोधी पक्षाकडूनही विधानसभेत आवाज उठण्याची शक्यता रामटेके यांनी व्यक्त केली.
आता लक्ष दोषींवरील कारवाईकडे…
या प्रकरणात संस्थाचालक राजाभाऊ मुनघाटे,बिनपात्रता असलेल्या नियुक्त उमेदवारावर,तसेच शंभर वेळा तक्रारी करूनही हालचाल न करणाऱ्या शिक्षण विभागावर कोणती कारवाई होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंघाटे यांची प्रतिक्रिया…
दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंघाटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सदर तक्रारदार हे आमच्याच शाळेचे शिक्षक होते ते आता सेवानिवृत्त झाले आहे.वंदना मुंघाटे यांच्या नियुक्तीवर तक्रार दहा वर्षापूर्वीच करण्यात आली होती पण आम्ही त्यांच्या नियुक्तीत कोणतीही प्रक्रिया चुकीची केलेली नाही.संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर मान्यतेनंतरच केलेली आहे.




