गडचिरोली : गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या बोनस रकमेच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून थकीत बोनसची रक्कम तातडीने अदा करण्याची स्पष्ट मागणी केली होती. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला असून, वनपट्टे धारक शेतकऱ्यांच्या बोनस रकमेचे वितरण सुरू झाले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बोनस थकित असल्याने वनपट्टे धारक शेतकरी चिंतेत होते. बोनस न मिळाल्याने शेतमालाचे उत्पादन, आगामी हंगामाची तयारी तसेच आर्थिक नियोजनावर परिणाम होत होता. मात्र, खासदार किरसाण यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांशी चर्चा, कागदपत्रांची मागणी, सरकारी तिजोरीतून निधी वाटपाची मागणी यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण…
थकीत बोनसची रक्कम मिळायला सुरुवात झाल्याने वनपट्टे धारक शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खासदार किरसाण यांचे आभार मानले असून, त्यांच्या संघर्षामुळे हा न्याय्य हक्क मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. किरसाण यांचे मत व्यक्त केले आहे की “शेतकऱ्याचा हक्काचा प्रत्येक पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. वनपट्टेधारकांनी आपल्या कष्टाने उत्पादन केलेल्या शेतमालाचा बोनस थकित राहणे अन्यायकारक होते. त्यामुळे हे प्रकरण तातडीने निकाली निघणे आवश्यकच होते.”
बोनस रकमेचे वितरण गतीने पूर्ण व्हावे, कोणताही शेतकरी वंचित राहू नये आणि प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी खासदारांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना केली असल्याचे कळते.
खासदार डॉ. नामदेव किरसाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या मनातील जुनाच प्रश्न मिटला असून त्यांच्या आर्थिक अडचणींना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील कृषिजन्य अर्थचक्राला यामुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.




