मुंबई / गडचिरोली – दि. 19 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या जेसाभाई मोटवानी यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पुढील सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांद्वारे समोर येत आहे.
हा निर्णय मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून घेण्यात आला असून, यासंदर्भातील अधिकृत पत्र आज टिळक भवन, दादर (मुंबई) येथून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रावर वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जेसाभाई मोटवानी यांच्या निलंबनाचे नेमके कारण पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र गेल्या काही काळापासून पक्षात अंतर्गत मतभेद, संघटनात्मक विसंगती आणि शिस्तपालनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर झालेली कारवाई ही पक्षात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी घेतलेले पाऊल असल्याचे मानले जात आहे.
गडचिरोली काँग्रेसमध्ये मोठी खळबळ…
या निर्णयाची प्रत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून स्थानिक संघटनांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, या निलंबनाचा जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय समीकरणांवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलीकडील काही बैठकीत शिस्तभंगाच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांनी पक्षाची प्रतिमा अबाधित राखावी, संघटनेच्या मर्यादा ओलांडू नयेत आणि वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. मोटवानी यांच्या निलंबनामुळे नेतृत्वाने शिस्तभंगाविरोधात ‘शून्य सहनशक्ती’ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
या कारवाईनंतर गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील शक्तिसमीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काही स्थानिक नेते पुढील काही दिवसांत यावर प्रतिक्रिया देण्याची शक्यता असून, मोटवानी समर्थकांकडूनही भूमिका जाहीर होऊ शकते.
राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा –
काँग्रेसने पुन्हा एकदा अंतर्गत शिस्त सर्वात प्राधान्याने घेतली आहे.




