गडचिरोली – प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच शहरात उमेदवारीची लगबग वाढली आहे. महिला नगराध्यक्ष पदाचे आरक्षण असल्याने मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांनी आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीला उतरण्याचे ठरविलेले आहेत यामुळे सोपी प्रक्रिया ठेवण्याकरिता प्रशासनाकडे संयुक्तिक जबाबदारी असताना सुद्धा अशा प्रकारे उमेदवारांना अडचणीला समोर जावे लागत असल्याची आज परिस्थिती नगरपालिका गडचिरोली परिसरात पाहायला मिळालेली आहे.
ऑनलाइन फॉर्मची हार्ड कॉपी दिल्यानंतरही पुन्हा ऑफलाइन अर्जाची सक्ती; उमेदवारांची दमछाक…
मागील काही दिवसांत अनेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची हार्ड कॉपी आणि प्रतिज्ञापत्र नियुक्त अधिकाऱ्यांकडे जमा केले होते. ऑनलाइन सिस्टम वापरताना निवडणूक विभागाने स्पष्ट सूचना दिली होती की –
“ऑनलाइन फॉर्ममध्ये एखादा रकाना रिकामा राहिला तरी त्यात पेनने काहीही लिहायचे नाही. कोणताही हस्ताक्षरित बदल अधिकृत मानला जाणार नाही.”ही पूर्वसूचना उमेदवारांनी काटेकोरपणे पाळली. रिकामा रकाना भरण्यासाठी पेन वापरला नाही, कारण तो नियमभंग ठरला असता.
मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याने ऑफलाइन फॉर्म भरावेत अशी सूचना केली. त्या अनुषंगाने गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणूक प्रशासनाने –“ऑनलाइन फॉर्म दिलेला असला तरी सर्वांनी पुन्हा ऑफलाइन फॉर्म खरेदी करून अर्ज भरा,”असा आदेश जारी केला आहे.
प्रत्येक फॉर्मसाठी ₹100 आकारून पुन्हा अर्ज लिहिण्यास सांगण्यात आले. यामुळे अनेक उमेदवारांना दोन-दोनदा फॉर्म भरण्याची वेळ आली असून महिलांना तर मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.
“रिकामा रकाना पेनने भरू नका” आणि नंतर पुन्हा “नवीन फॉर्म भरा”! – गोंधळात टाकणारी प्रक्रिया…
“ऑनलाइन सिस्टमवर फॉर्म भरताना स्पष्ट सांगितले होते की पेनने काहीही लिहायचे नाही. ही नियमावली आम्ही पाळली. पण आता त्याच फॉर्मला ‘त्रुटी’ म्हणत पुन्हा ऑफलाइन फॉर्म का?”असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यामुळे निवडणूक विभागाचा दुहेरी निकष आणि अकार्यक्षमता उघड झाल्याची टीका उमेदवार करत आहेत.
आचारसंहितेतही राजकीय मेळावे; पण तपासणी पथक दिसलेच नाही…
आचारसंहिता लागू असूनही शहरात अनेक राजकीय पक्षांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य सभांचे आयोजन केले. इंदिरा गांधी चौकातील ‘राजीव गांधी भवन’ येथे बिरसा मुंडा जयंतीच्या नावाखाली शेकडो लोकांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेऊन पक्षाचा उघड प्रचार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमास पोलिस सुरक्षा देखील देण्यात आली होती.
त्याउलट, निवडणूक प्रशासनाकडून तपासणी पथके कुठेच फिरताना न दिसल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे…
उमेदवारांना खर्च दरपत्रक आणि तांत्रिक माहिती उपलब्ध नाही…
उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अधिकृत दरपत्रक, पथकांची संख्या, त्यातील अधिकारी आणि कर्मचारी कोण – याबाबत माहिती मागितली असता,“आमच्याकडे माहिती नाही”असे उत्तर सोशल मीडिया सेलमधील कर्मचाऱ्याने दिल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.यामुळे नवखे उमेदवार, विशेषतः महिला उमेदवार मोठ्या प्रमाणात गोंधळून गेले आहेत.
मुख्य जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून व्यवस्था सुधारावी – उमेदवारांची मागणी…
निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेला गोंधळ, दुहेरी प्रणाली, तांत्रिक अडथळे आणि अपुऱ्या माहितीमुळे उमेदवार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मुख्य जिल्हाधिकारी यांनी तातडीने निवडणूक कार्यालयाची तपासणी करून व्यवस्था सुधारावी, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.




