शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा इशारा – तीन दिवसांत मदत जाहीर न केल्यास होणार मुंडन आंदोलन!
गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे शेतीप्रधान असून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आजही पोटाच्या प्रश्नासाठी शेतीवरच अवलंबून आहेत. धान, सोयाबीन आणि कपाशी ही प्रमुख पिके घेणारे शेतकरी सध्या अवकाळी पावसामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील पीक हाती येण्याआधीच अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे.
आधीच रानटी हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, या अवकाळी पावसाने त्यावर आणखी एक आघात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून जिल्हाभरात शेतकरी संकटात सापडले आहेत.
मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वित्त राज्यमंत्री आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतलेला नाही. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष आर्थिक मदत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, अशी तीव्र टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधत म्हटले की “जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. पालकमंत्री दोन आहेत, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला मात्र कोणताही मंत्री पुढे येत नाही. हे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सरकारकडून तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत जाहीर व्हावी.”
ब्राह्मणवाडे पुढे म्हणाले की “जर तीन दिवसांच्या आत पालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली नाही आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा निर्णय घेतला नाही, तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांसह ‘मुंडन आंदोलन’ करण्यात येईल.”
काँग्रेसने दिलेला हा इशारा आता प्रशासन व राज्य सरकारसाठी एक आव्हान ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत जिल्हा काँग्रेसने दिले आहेत




