Home सामाजिक आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी – डॉ. आशिष कोरेटी.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी – डॉ. आशिष कोरेटी.

0
129

 

गडचिरोली, दि. २७ ऑक्टोबर २०२५ :

वन जन हक्क (वजह) फाउंडेशन चे संस्थापक डॉ. आशिष कोरेटी यांनी आज गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध गंभीर प्रश्नांवर तसेच आदिवासी समाजाच्या मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत आदिवासी समाजाचे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि वनहक्काशी संबंधित विषयांवर सखोल संवाद साधण्यात आला. डॉ. कोरेटी यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेत सकारात्मक उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी आम्ही केली आहे.

तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांनी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य आणि भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ग्रामीण भागात इंटरनेट सेवेतील अडचणींमुळे शेतकऱ्यांना ई-पिक नोंदणी करताना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ई-पिक ऑफलाइन पद्धतीने करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच ओबीसी समाजाच्या ‘महाज्योती’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणीही डॉ. कोरेटी यांनी केली.

या चर्चेदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य सेवा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी यावरही विशेष चर्चा झाली.

या प्रसंगी मायाताई इवनाते (मा. सदस्य, अनुसूचित जनजाति आयोग, नवी दिल्ली व माजी महापौर, नागपूर), लोमेश उसेंडी (माजी नायब तहसीलदार), सारंग जांभूले, श्रीकांत आतला, तौफीक खान, अंकुश गाढवे, नीलकंठ गोहने, विलास कोरेटी, गणेश मडावी, प्रकाश हलामी, राकेश खुने, महेश उसेंडी, दीपक कोल्हे, विश्वेश्वर खुने, उमेश सहारे, स्वप्निल शिंपी, शिवकुमार भैसारे, भगवान सहारे, प्रभाकर तुलावी, पंकज कोल्हे तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. आशिष कोरेटी यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रशासनाशी समन्वय साधून सकारात्मक उपाययोजना राबवणे, हा ‘वजह फाउंडेशन’चा मुख्य उद्देश आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here