गडचिरोली : गडचिरोली शहरातील एस.टी. डेपोच्या आतल्या परिसरात एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा आनंद व्यक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल एक ते दीड तास मोठ्या आवाजात डीजे लावून नाचत धिंगाणा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी. विभागातील आगार उपाध्यक्ष संतराज रामचंद्र कलिये यांच्या 58 व्या वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा उत्सव कामगार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला सजविलेल्या रथावर बसवून, कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजात कर्मचाऱ्यांनी नाचत उत्सव साजरा केला. या कर्कश आवाजाचा त्रास इतका झाला की तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत तो स्पष्ट ऐकू जात होता.
यावेळी काही कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेतही बसगाड्या फलाटावर उभ्या करून विद्यार्थ्यांना व प्रवाशांना प्रतीक्षेत ठेवत डान्समध्ये दंग झाले होते.
या प्रकाराची चौकशी करण्यासाठी डेपो प्रबंधक अतुल रामटेके आणि जिल्हा नियंत्रक अशोक वाढीभस्मे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्याचे समजते. तर डीटीओ व्यवहारे यांना विचारणा केली असता त्यांनी “माहिती घेतो” एवढेच सांगितले.
डेपो परिसरातील सुरक्षा रक्षकांनी मात्र या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. “अशा पद्धतीने डीजे लावून नाचण्याचा प्रकार आम्ही आजवर कुठल्याही एस.टी. डेपोमध्ये पाहिलेला नाही,” अशी केविलवाणी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या संपूर्ण प्रकारामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून, नेहमी आपल्या कमी पगाराची रडगाणी करणारे अशा प्रकारे धिंगाणा घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एस.टी. विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
